संगमनेर : देशभरात यंदा समाधानकारक पाऊस असेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यानंतर, अहमदनगर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने मे महिन्याच्या २० तारखेला बैठक घेतली होती. कोरोना व पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व विभागांना सतर्क राहण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या. त्या दृष्टीने प्रशासकीय आता यंत्रणा कामाला लागली आहे.
आपत्ती व्यवस्थापनाच्या झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भाेसले यांनी कोरोना व पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्वांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या होत्या. उपविभागीय अधिकारी, अहमदनगर महानगरपालिका, जिल्हा परिषद यांचे अधिकारी, जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतील तहसीलदार, जिल्ह्यातील नगरपरिषदा, नगरपालिका, नगरपंचायतींचे मुख्याधिकारी, पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी आदी या बैठकीला ऑनलाइन उपस्थित होते, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ.वीरेंद्र बडदे यांनी सांगितले.
पावसाळ्यात कोणतीही आपत्ती आली, तरी त्याला सक्षमपणे तोंड देण्यासाठी यंत्रणा सज्ज आहे. लागणाऱ्या बोटी आणि इतर वस्तूंची सज्जता ठेवण्यात आली आहे. कोपरगाव, नेवासा, श्रीगोंदा, राहुरी येथे फायटर बोटी आहेत. आवश्यकतेनुसार इतर वस्तूही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तालुक्याच्या ठिकाणी लाइफ जॅकेट उपलब्ध आहेत. महसूल विभाग, पोलीस प्रशासन यांच्याकडेही लाइफ जॅकेट आहेत, असेही डॉ.बडदे यांनी सांगितले. महावितरणची जिल्हा पातळीवर कंट्रोल रूम तयार करण्यात आली आहे. असे महावितरणच्या संगमनेर उपविभागाचे प्रभारी अधिकारी एस.एस. मुळे यांनी सांगितले. अहमदनगर महानगर पालिकेने प्रत्येक प्रभागात प्रभागनिहाय आपतकालीन व्यवस्थापन कक्ष स्थापन केले आहेत.
माळीवाडा येथील अग्निशमन विभागात मुख्य कक्ष कार्यरत आहे. येथून या प्रभाग निहाय स्थापन केलेल्या कक्षांना सूचना देण्यात येतात.
--------------
अग्निशमन दल सज्ज
एखादी मोठी आपत्ती आल्यास प्रभागनिहाय स्थापन केलेल्या कक्षातील कर्मचारी एकत्र मिळून काम करतात. १ जूनपासून ते पावसाळा संपेपर्यंत २४ तास कर्मचारी येणाऱ्या आपत्तीचा सामना करण्यासाठी नियुक्त केले आहेत. कुठल्याही आपत्तीचा सामना करण्यासाठी अग्निशमन दल सज्ज आहे. असे अहमदनगर महानगरपालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शंकर मिसाळ यांनी सांगितले.
---------------
आपत्ती व्यवस्थापन संदर्भाने संगमनेर नगर परिषदेच्या वतीने आराखडा तयार करण्यात आला असून, तो जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे. नदी काठच्या नागरिकांना पूर्वसूचना म्हणून नोटीस दिल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापनाचे साहित्य एकत्र करत, नगरपरिषदेत विशेष कक्ष स्थापन केला आहे. पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येईल. या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
डॉ.सचिन बांगर, मुख्याधिकारी, संगमनेर नगरपरिषद.
-----------
हवामान खात्याकडून माहिती मिळते. त्यानुसार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून इतर सर्व विभागांना माहिती देण्यात येते. नदीकाठच्या गावांतील ग्रामस्थांना सूचना देण्यासाठी अलर्ट सीस्टिम असून, मोबाइलवर संदेशाद्वारे त्यांना माहिती कळविली जाते. आपत्तीचा सामना करण्यासाठी सैन्य दलाची तुकडीही सज्ज आहे.
डॉ.वीरेंद्र बडदे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, अहमदनगर
------------------
790