अहमदनगर : २१ जून रोजी होणाऱ्या महापौर-उपमहापौर पद निवडीचा सविस्तर कार्यक्रम पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी गुरूवारी जाहीर केला. १५ तारखेपासून महापौर पदाचे नामनिर्देशनपत्राचे वितरण केले जाणार आहे. २१ तारखेला सभागृहात माघार होणार असून महापौर पदासाठी हात उंचावून मतदान घेतले जाणार आहे. विभागीय आयुक्तांनी नगरचे जिल्हाधिकारी अनिल कवडे यांची महापौर पद निवडीच्या सभेसाठी पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती केली. २१ जूनला महापौर पदाची निवडणूकही त्यांनी जाहीर केली. जिल्हाधिकारी कवडे यांनी गुरूवारी महापौर-उपमहापौर पद निवडीचा सविस्तर कार्यक्रम जाहीर केला. महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील नगरसचिव कार्यालयात १५ जून ते १७ जून या कालावधीत नामनिर्देशनपत्राचे वितरण केले जाणार आहे. याच कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारले जाणार आहेत. १७ तारखेला दुपारी २ वाजेपर्यंत महापौर-उपमहापौर पदाचे नामनिर्देशनपत्र वितरीत केले जाणार असून तीन वाजेपर्यंत महापौर-उपमहापौर पदाचे नामनिर्देशनपत्र स्वीकारले जाणार आहेत. २१ तारखेला सकाळी ११ वाजता सभा सुरू झाल्यानंतर पीठासीन अधिकारी कवडे हे नामनिर्देशनपत्राची छाननी करणार आहेत. छाननीनंतर वैध उमेदवारांची नावे पीठासीन अधिकारी जाहीर करतील. त्यानंतर माघारीसाठी १५ मिनिटाचा वेळ दिला जाणार आहे. महापौर पदाच्या निवडणुकीसाठी एकापेक्षा अधिक नामनिर्देशनपत्र राहिले तर हात उंचावून सभागृहात मतदान घेतले जाणार आहे. महापौर-उपमहापौर पदासाठी नामनिर्देशनपत्र दाखल करताना अर्जावर सूचक व अनुमोदक म्हणून एक नगरसेवकाची सही लागणार आहे. एकदा एकाला झालेला सूचक व अनुमोदक हा दुसऱ्या उमेदवारी अर्जासाठी ग्राह्य धरता येणार नाही. शिवाय एका उमेदवाराला चार अर्ज दाखल करता येणार आहेत. (प्रतिनिधी)
महापौर पद निवडीचा कार्यक्रम जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2016 23:39 IST