याप्रकरणी पीडित विवाहिता दीपाली भूषण बागूल (वय ३० रा.लेखानगर पाईपलाईन रोड, अहमदनगर) हिने दिलेल्या फिर्यादीवरून विवाहितेचा पती भूषण विवेक बागूल, सासरा विवेक तुकाराम बागूल, सासू निर्मला विवेक बागूल (सर्व रा.आमे रेसिडेन्सी, टागोरनगर, नाशिक) व ननंद भाग्यश्री उमेश रासकर (रा. सातारा) यांच्याविरोधात कलम ३२३ (इच्छापूर्वक दुखापत करणे), कलम ४९८ अ (विवाहित स्त्रीशी क्रूरपणा करणे) आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ८ जुलै २०१९ ते २८ सप्टेंबर २०१९पर्यंत सासरी असताना नाशिक व पुणे येथे छळ झाल्याचे पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे.
दीपाली हिचे ६ जुलै २०१९ रोजी नगर येथे भूषण बागूल याच्यासोबत लग्न झाले होते. लग्नानंतर दीपाली सासरी गेली तेव्हा तिला पती व सासू,सासरे यांनी तुझ्या आई-बापांनी चांगले लग्न करून दिले नाही, लग्नात जेवन चांगले नव्हते असे म्हणत शिवीगाळ करून मानसिक त्रास दिला. त्यानंतर सासू, सासरे यांच्या सांगण्यावरून दीपाली हिला भूषण याने मारहाण केली. फ्लॅट घेण्यासाठी माहेरून पंधरा लाख अणावेत, दीपाली हिने नोकरी सोडावी आदी कारणांमुळे तिचा वारंवार शारीरिक व मानसिक छळ केला. तसेच पुणे येथे राहत असताना भूषण याने दीपालीच्या पायावर कार चालवून तिला दुखापत केली. माहेरी येताना ९ तोळ्याचे दागिने सासरच्या लोकांनी दिले नाहीत. असे याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.