अहमदनगर : महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये आता ऑक्सिजनचे बेड उपलब्ध होणार असून, पहिल्या टप्प्यात आयुर्वेद महाविद्यालयातील कोविड केअर सेंटरमध्ये ऑक्सिजनची लाईन बसिवण्यासाठी महापालिकेने निविदा मागविल्या आहेत. कार्यारंभ आदेश देऊन तातडीने काम सुरू करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
कोरोनाच्या गंभीर रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत आहे. परंतु, ऑक्सिजनचे बेड उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची धावपळ होत आहे. ऑक्सिजन बेडची गरज लक्षात घेऊन महापालिकेने ऑक्सिजन बेड उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑक्सिजन बेडपर्यंत कॉपर धातूची लाईन बसवावी लागते. ही लाईन बसविण्यासाठी खासगी संस्थांकडून निविदा मागविली आहे. एका बेडसाठी सुमारे १४ हजार रुपये खर्च येणार असून, हे काम खासगी संस्थेकडून करून घेतले जाणार आहे.
महापालिका व विविध सामाजिक संस्थांच्या वतीने शहरात ठिकठिकाणी कोविड केअर सेंटर उभारण्यात आलेले आहेत. परंतु, या सेंटरमध्ये ऑक्सिजनचे बेड नाही. त्यामुळे मनपाच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्याही कमी झाली आहे. महापालिकेने आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. पुरेसे कर्मचारी आहेत. परंतु, ऑक्सिजन बेडची कमरता होती. त्यामुळे आयुर्वेद, शासकीय तंत्र निकेतन आणि जैन पितळे बोर्डींग येळे ऑक्सिजनचे बेड महापालिकेमार्फत उपलब्ध करून दिले जाणार आहेत. निविदा प्राप्त झाल्यास हे काम तातडीने पूर्ण केले जाणार असल्याने गंभीर रुग्णांना काहीसा दिलासा मिळणार आहे.
...
असे ऑक्सिजनचे बेड
आयुर्वेद महाविद्यालय- २७
शासकीय तंत्रनिकेतन- ६०
जैन पितळे बोर्डिंग- ७४
.....
ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणार
महापालिकेकडून सावेडी कचरा डेपो येथे ऑक्सीज निर्मितीचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पा संपूर्ण जबाबदारी यंत्र अभियंता परिमल निकम यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्यांच्याकडून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्याची तयारी सुरू असल्याचे सांगण्यात आले.
...