अहमदनगर : नगर शहरातून जाणा-या नगर-मनमाड रस्त्याला रस्त्याला जोडणा-या निंबळक बायपास रस्त्यावर शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास मालट्रक उलटला. या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. परंतु सुमारे सहा तासांपासून या रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली असून लांबपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.नगर-मनमाड रस्त्यासाठी पुण्याहून येणारी जड वाहतूक केडगावपासून या निंबळक बायपास रस्त्यावरुन वळविली आहे. या रस्त्यावर शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास खताच्या गोण्या वाहून नेणारा १६ टायरचा मालट्रक रस्त्याच्या मधोमध उलटला. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. परंतु या रस्त्यावरुन सुमारे सहा तासांपासून वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे कल्याणरोडपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. हा ट्रक मनमाडकडे राजस्थानला चालला होता. दोन क्रेनच्या साह्याने मालट्रक बाजूला काढण्याचे काम सुरू होते. दरम्यान दुपारी बारा वाजेपर्यंत या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत झाली नव्हती.
नगरला बायपास रस्त्यावर मालट्रक उलटला; सहा तासांपासून वाहतूक ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 11:45 IST