पळवे : पारनेर तालुक्यातील पळवे येथील कलाशिक्षक कानिफनाथ गायकवाड यांनी श्री भैरवनाथ विद्यालय पळवे व पारनेर तालुका कला शिक्षक संघाच्या संयुक्त विद्यमाने, ऑनलाइन ‘गणपती बनवा’ कार्यशाळा घेतली. यामध्ये युट्यूबच्या माध्यमातून मुलांना घरीच बसून शाडू मातीपासून पर्यावरणपूरक गणपती बनविण्याचे प्रशिक्षण (प्रात्यक्षिक) दिले. यात एक हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
मुलांच्या सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी कला, क्रीडा विषय अत्यंत महत्त्वाचा असून, बालवयाची जडण-घडण यावरच अवलंबून असते. या सर्वांचा विचार करून कलाशिक्षक कानिफनाथ गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन मातकामांतर्गत शाडू मातीपासून गणपती बनविणे, प्रात्यक्षिक दाखवून पर्यावरणपूरक गणपती बनविणे शिकविले, अत्यंत आनंदाने या ऑनलाइन कार्यशाळेत मुलांनी सहभाग घेऊन उपलब्ध मातीपासून गणपती बनविले. विशेष म्हणजे, या उपक्रमात अनेक पालकांनीही सहभाग घेतला आणि स्वनिर्मितीचा आनंद घेऊन, त्याच गणपतीची प्रतिष्ठापना केली. श्री भैरवनाथ विद्यालयासोबत परिसरातील शेकडो विद्यार्थ्यांनी या ऑनलाइन कार्यशाळेत सहभाग घेतला. यामध्ये गुरुदेव स्कूल वाघुंडे, माउली एज्युकेशन सुपा, पवारवाडी जि.प. शाळा खंडोबामाळ, जि.प. शाळा, श्रीसमर्थ स्कूल म्हसणे फाटा आदी शाळांचा सामावेश आहे. कार्यशाळा आयोजित केल्याबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष सुहास शेळके, मुख्याध्यापिका वैशाली शेळके, जिल्हा कलाशिक्षक संघाचे अध्यक्ष संजय पठाडे आदींनी मार्गदर्शन करून कौतुक केले.