श्रीगोंदा : लोणी व्यंकनाथ शिवारातील रेल्वे गेटजवळ मक्याने भरलेला ट्रक लुटून २५ क्विंटल मका एका टोळीने पळविला होता. ही घटना ११ जुलै रोजी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडली होती. यातील चार आरोपींना पोलिसांनी अटक करीत त्यांच्याकडून २५ लाख ६६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी आर्यन शंकर कांबळे (रा. सांगवी, ता. फलटण, जि. सातारा), संजय बबन कोळपे (रा. बोरी, ता. श्रीगोंदा), गणेश श्रीमंत गिरी (रा. श्रीगोंदा कारखाना), भाऊसाहेब गंगाराम पालवे (रा. श्रीगोंदा कारखाना) व इतर एक अशा पाचजणांनी हा ट्रक लुटल्याचे उघड झाले आहे. कन्नोज (उत्तर प्रदेश) येथून ३० टन मक्याची पोती भरून ट्रक (एमपी ०९, एचएच ९५३२) हा सांगली येथे पोहोच करण्यासाठी जात असताना ११ जुलै रोजी रात्री एक वाजण्याच्या सुमारास लोणी व्यंकनाथ येथील रेल्वे गेटच्या पुढे ट्रक आरोपींनी अडवून तो बाबुर्डी शिवारातील वस्तीजवळ नेऊन आरोपींनी त्यांच्या चौदा टायर ट्रकमध्ये सुमारे २५ टन मका भरून घेऊन पळून गेले. याप्रकरणी ट्रकचालक नीलेश चतरसिंग लोदी (रा. बधोरीया, जि. शिवपुरी, मध्य प्रदेश) यांनी फिर्याद दिली.
पोलीस उपनिरीक्षक अमित माळी, पोलीस हेड काॅन्स्टेबल अंकुश ढवळे, दादासाहेब टाके, किरण बोराडे, गोकुळ इंगवले, प्रकाश मांडगे, अमोल कोतकर, वैभव गांगडे, पो. कॉ. प्रशांत राठोड यांनी चार आरोपींना अटक केली.