अहमदनगर : ग्रामीण डाकसेवकांना खात्यात सामाऊन घेऊन सातवा वेतन आयोग व कमलेशचंद्र कमिटीच्या शिफारशी लागू करण्याच्या मागणीसाठी चालू असलेल्या बेमुदत संपाच्या पंधराव्या दिवशी अखिल भारतीय ग्रामीण डाकसेवक संघटनेच्या वतीने खासदार दिलीप गांधी यांच्या कार्यालयासमोर घंटा व थाळीनाद आंदोलन करण्यात आले.केंद्र सरकार ग्रामीण डाक सेवकांच्या प्रश्नांकडे लक्ष देत नसल्याने सरकारला जाग आणण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष आनंद पवार, सचिव एन. बी. जहागीरदार, अशोक बंडगर, भीमराज गिरमकर, लक्ष्मण बर्डे, सूर्यकांत श्रीमंदीलकर, सलिम शेख, संतोष औचरे, दिलीप मेटे, विजय एरंडे, दत्तात्रय कोकाटे, बी. डी. ढोकळे, रशीद सय्यद, चंद्रकांत पंडित, गौतम गवते, कैलास माने, आर. आर. गवते, सिद्धेश्वर घोडके, पी. आर. तनपुरे आदींसह जिल्ह्यातील ग्रामीण डाकसेवक सहभागी झाले होते. सदर मागण्या मान्य न झाल्यास आक्रमक पवित्रा घेत मुख्य डाक कार्यालयाचे गेटबंद आंदोलन करुन इमारतीवरून उड्या टाकून आत्महत्या करण्याचा इशारा ग्रामीण डाकसेवकांनी दिला आहे. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आलेला आहे. डाक विभागाचे कामकाज केंद्र सरकारमार्फत चालून देखील ग्रामीण डाक सेवकांना अद्याप सातव्या वेतन आयोगाची तरतूद करण्यात आलेली नाही. सदरील मागण्यांसाठी ग्रामीण डाक सेवकांनी वेळोवेळी आंदोलने केली. मात्र मागण्या मान्य होत नसल्याने ग्रामीण डाक सेवकांनी दि. २२ मे पासून बेमुदत संप पुकारला आहे.
खासदारांच्या कार्यालयासमोर डाकसेवकांचा घंटानाद : संप सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 11:32 IST