अहमदनगर : एसटीच्या चालक-वाहकांची कायमच हेटाळणी करणाऱ्या प्रवाशांना मंगळवारी मात्र या कर्मचाऱ्यांतील माणुसकीचे दर्शन घडले. चालत्या एसटी बसमध्ये प्रसूती झालेल्या महिलेला या चालक-वाहकांनी मदत करत तातडीने जिल्हा रूग्णालयात नेल्याने आई व बाळावरील बाका प्रसंग टळला.त्याचे झाले असे, तारकपूर आगाराची नगर-सुंबेवाडी ही मुक्कामी बस सकाळी सात वाजता सुंबेवाडीहून निघाली. पिंपळा, लोणी, मांडवा, उक्कडगाव असा प्रवास करत एसटी नारायणडोहोमध्ये पोहोचली. गर्दी नेहमीपेक्षा जरा कमीच होती. नारायणडोहोमधून एक गरोदर महिला तिच्यासोबत असणाऱ्या वृद्धेसोबत गाडीत चढली. गाडी नारायणडोहोच्या एक किलोमीटरही पुढे आली असतानाच सदर गरोदर महिलेला प्रचंड कळा येऊ लागल्या. तिच्यासोबत जबाबदार अशी कोणीच व्यक्ती नव्हती. सोबत असणारी महिला वृद्ध असल्याने तिही काही करू शकत नव्हती. शिवाय गाडीत अन्य महिलाही नव्हत्या. इतर पुरूष प्रवाशांचाही नाईलाज झाला. त्यामुळे मदतीला कोणीच येत नव्हते. शेवटी काही वेळातच ती महिला प्रसूत झाली. अशा या बिकट प्रसंगात वाहक व चालकाने माणुसकीचे दर्शन घडवत त्या महिलेला मदत केली. वाहक थोरात यांनी बाळाला व महिलेला सावरले. तसेच प्रसंगावधान राखत चालक डी. के. शिरोळे यांनी गाडी मध्ये न थांबवता थेट जिल्हा रूग्णालयात आणली. तेथे तातडीने तिच्यावर उपचार करण्यात आल्याने आता महिला व बाळ सुखरूप आहेत.चालक व वाहकाने दाखवलेल्या या प्रसंगावधानाचे अनेकांकडून कौतूक होत असून, तारकपूर आगारानेही याची दखल घेत त्यांचा सत्कार करण्याचे ठरवले आहे. आगारप्रमुख प्रमोद नेहूल यांच्यासह अनेकांनी या कर्मचाऱ्यांचे विशेष अभिनंदन केले. (प्रतिनिधी)
एसटीतच महिलेची प्रसूती!
By admin | Updated: June 18, 2014 01:22 IST