अहमदनगर : मागील दरवाजाने भीक मागून मंत्रिपद मिळविलेल्या महादेव जानकर यांना सत्तेची मस्ती चढली असून, सत्तेच्या मस्तीतच ते बेताल वक्तव्य करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले व शहर जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे. भगवानगडावर पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली़ त्यांच्या या वक्तव्याचे राज्यभर पडसाद उमटले़ नगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसने जानकरांच्याविरोधात पत्रक प्रसिद्ध केले़ पत्रकात म्हटले आहे, की राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी केलेली टीका पुरोगामी राज्यातील मंत्र्यांच्या तोंडून शोभत नाही़ एखादा गावगुंड ज्या पद्धतीची भाषा वापरतो, त्याच पद्धतीची भाषा जानकरांची होती़ यावरून फुले, शाहू, आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांना आदर्श मानणारे हेच का ते जानकर ? असा प्रश्न पडतो़राजकारणात आरोप-प्रत्यारोप हे होत असतात़ परंतु, विरोधी पक्षनेते मुंडे व विधिमंडळ नेत्यांचा एकेरी उल्लेख करून टीका करणे योग्य आहे का? एवढेच नव्हे, तर जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्याबाबतही त्यांनी अपशब्द वापरले़ अधिकारी कुणासमोर लाळ घोटून मागच्या दाराने येत नसतात हे जानकरांनी लक्षात घ्यावे. एक मंत्रीच प्रशासनातील अधिकाऱ्यांबाबत असे बोलत असेल, तर त्याचा सामान्यांनी काय बोध घ्यायचा़ भीक मागून मंत्रिपद मिळविले, त्या जानकरांना इतरांवर टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही़ राज्याच्या जडणघडणीत पवार कुटुंबीयांचे फार मोठे योगदान आहे, याचे भान न ठेवता उथळपणाने बेताल अर्वाच्च भाषेत टीका करणे मंत्र्याला शोभत नाही, असे पत्रकात म्हटले आहे.
महादेव जानकर यांना सत्तेची मस्ती
By admin | Updated: October 13, 2016 00:58 IST