अहमदनगर : पिंपळगाव माळवी तलवातून पूर्वी शहराला पाणीपुरवठा केला जात होता. तेथील पाणी उपसा केंद्रात ब्रिटिशकालीन यंत्रसामग्री होती. ती चाेरीला गेल्याची तक्रार नगरसेवक सागर बोरुडे यांनी आयुक्तांकडे केली आहे. याबाबत महापालिकेकडे कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे.
पिंपळगाव माळवी येेथे महापालिकेचे पाणीउपसा केंद्र आहे. जुन्या काळातील इंजीनसह अन्य यंत्रसामग्री बंद खोलीत ठेवण्यात आलेले आहे. याकडे राष्ट्रवादीचे नगरसेवक सागर बोरुडे यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या सभेत त्यांनी पिंपळगाव माळवी येथील यंत्रसामग्रीबाबतचा मुद्दा उपस्थित केला. पिंपळगाव माळवी येथील यंत्रसामग्रीबाबत बोरुडे यांनी माहिती विचारली असता प्रशासन निरुत्तर झाले. अशी कोणतीही माहिती मनपाच्या दप्तरी नसल्याचे उघड झाले आहे. बहुतांश यंत्रसामग्री चोरीला गेली असल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्यावर यापूर्वी जे झाले ते झाले. परंतु, सद्य:स्थितीत जी यंत्रसामग्री उपलब्ध आहे, त्याची नोंद करून घ्या. तसेच ही यंत्रसामग्री चोरीला जाऊ नये, यासाठी तिथे एका कर्मचाऱ्याची कायमस्वरूपी नियुक्ती करा, असा आदेश सभापती अविनाश घुले यांनी दिला आहे.
...
जुन्या यंत्रसामग्रीकडे मनपाचे दुर्लक्ष
महापालिकेची जुन्या काळातील यंत्रसामग्री ठिकठिकाणी धूळ खात पडून आहे. लाखो रुपयांच्या साहित्याकडे दुर्लक्ष झाल्याने ते चोरीला जात आहे. त्याकडे महापालिका प्रशासन व पदाधिकाऱ्यांचेही दुर्लक्ष होत आहे. जुना ठेवा जतन करण्याची आवश्यकता आहे, अशी मागणी वेळोवेळी नगरसेवकांकडून करण्यात येत आहे.