निघोज : पारनेर तालुक्यातील शिरापूर गावाने कृषिपंपाच्या वीजबिलाचा एकरकमी भरणा करून महाराष्ट्र राज्यात यशस्वी सहकार चळवळीचा आर्दश निर्माण केला आहे.
जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीचे माजी अध्यक्ष मधुकर उचाळे यांच्या मार्गदर्शनाखाली व सरपंच हनुमंत भोसले, उपसरपंच संतोष नरसाळे यांच्या सहकार्यातून गावाने एकत्रित वीजबिल भरणा करण्याचा निर्णय घेतला. यासाठी नियोजन करताना कृषिपंपाच्या वीजबिलाची रक्कम एकत्र करून ग्रामपंचायतमार्फत एकरकमी भरणा करणे, प्रत्येक रोहित्रावर संबंधित लाभधारकांचा स्वतंत्र बोर्ड, रोहित्र खराब झाल्यावर शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून ग्रामपंचायतीकडे अधिकचे रोहित्र अशा अनेक उपाययोजना राबवण्यात येणार आहेत. या उपाययोजनांची दखल घेत महावितरणच्या अधिकाऱ्यांनी गावास भेट दिली व विजेच्या समस्या जाणून घेतल्या.
महावितरणचे कार्यकारी अभियंता कन्हैय्यालाल ठाकूर, उपकार्यकारी अभियंता नीलेश रोहनकर, उपकार्यकारी अभियंता प्रशांत आडभाई, निघोज सहायक अभियंता नामदेव शेळके, वडझिरेचे सहायक अभियंता गौरव चरडे यांच्यासह सेवा संस्था अध्यक्ष दिनेश लोणकर, उपाध्यक्ष मल्हारी शिनारे, माजी सरपंच भास्कर उचाळे, माजी उपसरपंच संतोष शिनारे आदी उपस्थित होते.