अहमदनगर : विविध खेड्यांमधून नगरमध्ये शिक्षणासाठी दाखल झालेल्या तरुणांनी एकत्र येत माईक एकांकिका बसवली अन् पुण्यातील प्रतिष्ठेची पुरुषोत्तम एकांकिका स्पर्धा गाजविली. या तरुणांनी तब्बल ३५ वर्षानंतर पुरुषोत्तम करंडकावर नगरचे नाव कोरले़ अशा या माईक एकांकिकेच्या टीमचा ‘लोकमत’ने बुधवारी गौरव केला.‘लोकमत’चे सरव्यवस्थापक शिरीष बंगाळे, आवृत्ती प्रमुख सुधीर लंके, वरीष्ठ उपसंपादक सुरेश वाडेकर, सुदाम देशमुख यांच्या हस्ते ‘माईक’च्या टीमचा सत्कार करण्यात आला. यावेळी लेखक संदीप दंडवते, दिग्दर्शक कृष्णा वाळके, भैया ही भुमिका साकारणारा विराज अवचिते, साळवे भुमिका साकारणारा संकेत जगदाळे, सलीम साकारणारा ऋषभ कोंडावार, नेता व मॅनेजरची भूमिका करणारा अमित रेखी, निखिल शिंगे (डेव्हीड), आकाश मुसळे (मुश्ताक), शुभम पोपळे (हरिभाऊ), अभिषेक रकटे (पिंट्या) यांच्यासह अमोल साळवे, श्रेयस बल्लाळ, प्रिया तेलतुंबडे, संदीप कदम, शुभम घोडके, रेणुका ठोकळे आदी उपस्थित होते.माईक एकांकिकेच्या लिखाणापासून पुरुषोत्तम करंडक पटकावण्यापर्यंतचा प्रवास या टीमने ‘लोकमत’समोर उलगडला. वाघोलीजवळ वाहतूक कोडींत अडकलेल्या संदीप दंडवते यांनी मंडप उभारणीचे काम पाहिले अन् तेथेच ‘माईक’चा जन्म झाला़ त्यानंतर एकांकिका लिखाण, पात्र निवड अन् ‘माईक’चे प्रयोग असा सर्व प्रवास लेखक संदीप दंडवते यांनी उलगडून दाखविला़ तर ज्या न्यू आर्टस् कॉलेजकडून ही एकांकिका सादर झाली ते कॉलेजच पुरुषोत्तम स्पर्धेसाठी पात्र नसल्याचे समजणे आणि तेथून पुढे प्रवेश मिळविण्यापासून करावी लागलेली कसरत ते अजिंक्यपदाचा बहुमान असा प्रवास दिग्दर्शक कृष्णा वाळके यांने ‘लोकमत’समोर मांडला़
‘लोकमत’ने केला ‘माईक’च्या टीमचा गौरव; उलगडला ‘पुरुषोत्तम’चा प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 14:45 IST