श्रीरामपूर : बहुजन वंचित आघाडीच्या वतीने शिर्डी मतदारसंघात डॉ.अरुण प्रभाकर साबळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ते निवृत्त वैैद्यकीय अधिकारी असून अकोले व संगमनेर येथे १५ वर्षे त्यांनी सरकारी वैैद्यकीय सेवा बजावली आहे. आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी त्यांच्या नावाची घोषणा केली.वंचित आघाडीने शुक्रवारी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. आजअखेर त्यांनी राज्यातील ३७ जागांवर उमेदवार दिले आहेत. आघाडीच्या वतीने धनगर, भिल्ल, कोळी, मुस्लिम, कुणबी यांच्यासह आजवर उपेक्षित राहिलेल्या अनेक घटकांना लोकसभेच्या रिंगणात उतरविण्यात आले आहे. शिर्डीचे उमेदवार डॉ.साबळे हे एमबीबीएस आहेत. ते सध्या राहाता येथे एक्स-रे तज्ज्ञ म्हणून व्यवसायात आहेत. वैैद्यकीय अधिकारी म्हणून सरकारी सेवेत त्यांनी प्रदीर्घ काळ नोकरी केली. शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेना व काँग्रेस पक्षाने अद्याप आपल्या अधिकृत उमेदवारांची घोषणा केलेली नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने संतोष रोहोम, भारतीय कम्युनिष्ट पक्षाने अॅड. बन्सी सातपुते यांची उमेदवारी घोषित केली आहे. आघाडीच्या वतीने बौद्ध समाजातील उमेदवार देण्यात आला आहे. मागील दोन्ही निवडणुकांत काँग्रेस व शिवसेनेने या समाजाला डावलेले होते. त्यामुळेच बौद्ध समाजाला रिंगणात उतरविण्याचा निर्णय आघाडीच्या वतीने करण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले़
Lok Sabha Election 2019: शिर्डी : वंचित आघाडीकडून अरुण साबळे रिंगणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 13:43 IST