अहमदनगर : अहमदनगर मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांचा अर्ज भरण्यासाठी मंगळवारी शहरातून काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीत चोरट्यांनी चांगलाच हात साफ केला. कार्यकर्त्यांचे महागडे मोबईल, सोन्याच्या साखळ््या (चैन), रोख रक्कम अशा लाखो रुपयांच्या ऐवजावर चोरट्यांनी डल्ला मारला. या रॅलीत चोरीच्या २० पेक्षा जास्त घटना घडल्या.रॅलीत चोरी करताना कार्यकर्त्यांनी एका चोरट्यास रंगेहात पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले तर आणखी एका चोरट्याला पोलिसांनी पकडले. मंगळवारी सकाळी ११ वाजता माळीवाडा येथून जगताप यांच्या रॅलीस प्रारंभ झाला. हजारो कार्यकर्ते या रॅलीत सहभागी झाले होते. यावेळी चोरट्यांनी मोबाईल, सोन्याच्या चैन आणि पाकिटमारी करण्यास सुरूवात केली. रॅलीसंपेपर्यंत २० पेक्षा जास्त जणांची चोरी झाली होती. ज्यांचे पैसे व वस्तू चोरीला गेल्या त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेतली. चोरीच्या घटनेनंतर लक्ष्मण भगवान कांबळे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांची ७० हजार रुपयांची सोन्याची चैन चोरट्याने चोरली. कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीत भारत बाबूराव जाधव, राजेश प्रेमचंद नारंग, आनंद श्रीकांतदास गुजराथी, कमलेश बलदेव झंवर यांच्यासह इतर सात ते आठ जणांच्या वस्तू चोरल्याचे म्हटले आहे़ ही फिर्याद दाखल झाल्यानंतरही रात्री उशिरापर्यंत अनेक जण कोतवाली पोलीस ठाण्यात येऊन रॅलीत वस्तू चोरी झाल्याच्या तक्रारी करत होते. पोलिसांच्या ताब्यात असलेल्या चोरट्याने तो पाथर्डी येथील असल्याची माहिती दिली आहे.
Lok Sabha Election 2019 : चोरट्यांनी प्रचार रॅलीत केला हात साफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 11:54 IST