अहमदनगर : अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठीची अधिसूचना आज जारी करण्यात आली असून पहिल्याच दिवशी एकूण २१ जणांनी ३९ अर्ज नेले. मात्र यात प्रमुख उमेदवारांचा समावेश नाही. पहिल्या दिवशी अर्जही कोणी दाखल केला नाही.गुरुवारपासून अहमदनगर मतदारसंघासाठी अधिसूचना आज जारी झाल्यानंतर नामनिर्देशन प्रक्रिया सुरु झाली. या लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी राहुल द्विवेदी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे यांनी निवडणूक यंत्रणेचे १७ अधिकारी-कर्मचारी या प्रक्रियेसाठी नियुक्त केले आहेत.गुरूवारी पहिल्याच दिवशी २१ जणांनी एकूण ३९ अर्ज नेले. उमेदवारी अर्ज मोफत असून अर्ज भरतेवेळी अनामत रक्कम (खुला- २५ हजार, आरक्षित १२५०० रूपये) भरावी लागते. सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत अर्ज स्वीकारले जात आहेत. अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक ४ एप्रिल (गुरुवार) असून छाननी ५ एप्रिल रोजी होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ८ एप्रिल आहे. अर्ज भरताना उमेदवारांसह केवळ ४ जणांनाच दालनात येता येईल.गुरूवारी पहिल्याच दिवशी अर्ज नेण्यासाठी आलेल्या संभाव्य उमेदवारांना या कक्षातून परिपूर्ण माहिती दिली जात होती. पहिल्या दिवशी प्रमुख पक्षांच्या कोणत्याच उमेदवारांनी अर्ज नेले नाहीत. वंचित आघाडीचे उमेदवार सुधाकर आव्हाड, संजीव भोर, सबाजी गायकवाड , नामदेव वाकळे, साईनाथ घोरपडे आदींसह २१जणांनी ३९ अर्ज नेले. मात्र अद्याप कोणीही अर्ज दाखल केलेला नाही.