टाकळी ढोकेश्वर : पारनेर तालुक्यातील कान्हूरपठार येथील कोरड्या विहिरीत पडलेल्या काळविटाच्या नर व मादी जोडीला वनविभागाच्या अधिकारी, कर्मचारी यांनी ग्रामस्थांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढले. यातील जखमी नर काळविटाला प्राथमिक उपचारानंतर अधिक उपचारासाठी पारनेरला पशुवैद्यकीय दवाखान्यात दाखल करण्यात आले. तर मादी काळविटाला प्रथमोपचार करून निसर्गात मुक्त करण्यात आले.कान्हूरपठार शिवारातील किन्ही रस्त्यावरील दूध शितकरण केंद्राजवळील सीताराम दत्तात्रय ठुबे यांच्या अर्धवट अवस्थेतील कोरड्या पडलेल्या सुमारे २० फुट खोल विहिरीत जखमी अवस्थेत काळविटाची जोडी पडल्याचे रविवारी सकाळी ग्रामस्थांच्या लक्षात आले. ग्रामस्थांनी वन विभागास कळविल्यानंतर वन क्षेत्रपाल अर्जुन कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल बी. बी. गागरे, दादाराम तिकोणे, नितीन गायकवाड, मांडुळे, डोंगरे आदी वनविभागाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाचे कर्मचारी व ग्रामस्थ अमोल दिवटे, स्वप्नील सोमवंशी, दिलीप शेळके, पोपट नवले, दीपक ठुबे, मंगेश खोसे आदिंनी शिताफीने दोन्ही काळविटांना विहिरीबाहेर काढले. यातील नर काळविटाला गंभीर दुखापत झाल्याने या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गुंड, डॉ. पवार, डॉ.संतोष ठुबे, डॉ. शेखर ठुबे यांनी प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी पारनेरला पाठविण्यात आले. मादी काळविटाला किरकोळ दुखापत झाल्याने प्राथमिक उपचार करून सोडण्यात आले. (वार्ताहर)
विहिरीत पडलेल्या काळविटाच्या जोडीला जीवदान
By admin | Updated: June 12, 2016 22:42 IST