शिवाजी जाधवचांदेकसारे : देशात व महाराष्ट्रात कोरोनाव्हायरसच्या प्रादुर्भावामुळे प्रशासन व पोलीस यंत्रणेवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मोठा भार आहे. त्याचाच फायदा उठवत अवैद्य दारू विक्री करणारे खुलेआम हातभट्टीची दारू व देशी दारू विक्री करून अधिक पैसे कमावत आहेत. रविवारी सकाळी दहा वाजता श्रावण भाऊराव भोजने यांच्या उसाच्या शेतात लपवून ठेवलेले चार हजार किंमतीते दोन-बँरल (चारशे लिटर) रसायन सोनेवाडी ग्रामस्थांनी पोलीस हवालदार अर्जुन बाबर यांच्या उपस्थितीत ओतून दिले. येथून पुढे सोनेवाडीत दारूबंदी होणार, असा पवित्राच ग्रामस्थांनी घेतला आहे.कोरोनाव्हायरसच्या धर्तीवर ग्रामपंचायत, पोलीस पाटील व ग्रामस्थांनी १४ एप्रिलपर्यंत संपूर्ण परिसर लाँक डाऊन केला. मात्र स्थानिक प्रशासनाच्या सुचनेला न जुमानता सोनेवाडीतील अवैद्य दारू विक्री करणाऱ्यांनी आपला धंदा बंद केला नाही. सरपंच गंगाराम खोमणे, उपसरपंच किशोर जावळे, पोलीस पाटील दगू गुडघे, बबलू जावळे, ग्रामपंचायत सदस्य चिलिया जावळे, भास्कर जावळे, बाळासाहेब जावळे,आण्णा गाढे,कर्णा जावळे, गोरक्षनाथ पोतकुले हे सदर अवैध दारूच्या विक्री करण्याच्या ठिकाणी गेले. तेथे त्यांना अरेरावीची भाषा करण्यात आली. सदरची माहिती कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल कटके,उप पोलीस निरीक्षक इंगळे यांना कळल्यानंतर त्यांनी सोनेवाडीत दारू विक्रेत्यांवर कारवाई केली. कमलाबाई ताराचंद वायकर व भागुबाई किशोर गांगुर्डे यांच्यावर अवैध दारू विक्री करण्याबाबत गुन्हे दाखल करण्यात आले.रविवारी नवनाथ श्रावण भोजने हा आपले वडील भाऊराव भोजने व भाऊ गोरख भोजणे यांच्यासमवेत उसाच्या शेतामध्ये दोन बँरल रसायन लपवून ठेवत असल्याची बातमी ग्रामस्थांना समजली. मग सरपंच गंगाराम खोमणे, उपसरपंच किशोर जावळे पोलीस पाटील, दगू गुडघे यांनी हवालदार अर्जुन बाबर यांना फोन करून बोलावून घेतले. काही ग्रामस्थांच्या मदतीने सरळ भोजने यांच्या शेतात रेड मारली असता दोन दारूच्या रसायनाने भरलेले बँरल जप्त करत ते रसायन ओतून दिले. नवनाथ भोजने याच्यावर कारवाई करण्यात आली. संपूर्ण गावातील अवैद्य दारूविक्री बंद झाली पाहिजे, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला. पोलीस हवालदार अर्जुन बाबर यांनी सांगितले की, पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली अवैद्य धंदे करणाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई केली जाईल. त्यासाठी गावातील ग्रामस्थांनीही मदत करावी असे आवाहन त्यांनी केले.
सोनेवाडीत दारूचा साठा पकडला, ग्रामस्थांनी दारु तयार करण्याचे रसायन दिले ओतून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 18:33 IST