अहमदनगर : जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने पेट्रोलचे दर गगनाला भिडले आहेत. गेल्या ४० वर्षांच्या तुलनेने पेट्रोलच्या दरात तब्बल ८६ रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे आता सामान्य नागरिकांना अत्यावश्यक वाटणारी वाहने बंद ठेवून आता विना इंधनाच्या सायकलचा वापर करण्याचा विचार नागरिक करू लागले आहेत.
१९९१ साली पेट्रोलचे दर प्रतिलिटर १४ रुपये ३२ पैसे इतके होते. त्यापुढील १० वर्षांनंतर हा दर १६ रुपये ७२ पैशांनी वाढला. त्यापुढील १० वर्षांनंतर हा दर दुप्पट झाला. २०११ साली पेट्रोल प्रतिलिटर ६१.९४ रुपये झाले. तर मे २०२१ मध्ये ते ९९ रुपये झाले आहेत. या महिन्यातच सहावेळा पेट्रोलच्या दरात वाढ झाली आहे. आधीच जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीने बेजार झालेल्या सामान्य नागरिकांना इंधन दरवाढीचा चांगलाच चटका सोसावा लागत आहे.
----
पेट्रोल दरवाढ
1991 - 14.32
2001 - 31.03
2011 - 61.94
2021 - 99
-------
तेलाच्या किमतीपेक्षा टॅक्स जास्त
राज्याच्या मूल्यवर्धित करानुसार पेट्रोलचे दर बदलू लागले आहेत. पेट्रोलच्या किरकोळ दरामध्ये कराचा वाटा एकूण प्रतिलिटर साधारणपणे ६१ टक्के इतका आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाचे दर कमी होत नसल्याने इंधनाचे दर कमालीचे वाढू लागले आहेत. तेलाच्या किमतीपेक्षाही त्यावरील करच जास्त आहेत. सध्या तेलावरच सर्व अर्थव्यवस्था अवलंबून आहे. त्यामुळे तेलाचे दर वाढल्याने सध्या महागाईचा भडका उडाला असून सामान्य नागरिक भरडला जात आहे.
------
पुन्हा सायकलवरून फिरावे लागणार
वर्षभरापासून कोरोनाचे संकट आहे. रोजगारावर परिणाम झाला आहे. व्यावसायिक घरात बसून आहेत. पेट्रोलसाठी शंभर रुपये लागत आहेत. सायकल वापरण्याशिवाय आता पर्याय राहिला नाही.
- स्वप्नील राऊत, नगर
-----
कुठेही जायचे असले तरी वेळ वाचावा यासाठी लोक दुचाकी वापरतात. पण आता पेट्रोलचा दर शंभर रुपये झाला आहे. सामान्य माणसाला परवडत नाही. त्यामुळे आता सायकलवरून प्रवास करायची वेळ आली आहे.
- बाळासाहेब भगत, नगर
----
ज्यांचे पोट हातावर आहे, अशांना पेट्रोलवर चालणारी दुचाकी परवडणारी नाही. पेट्रोलसाठी महिन्याला दोन हजार घालवावे लागतात. उरलेल्या पगारात कुटुंबाचे कसे भागणार ? कोरोना निर्बंधांमुळे कामे बंद आहेत. आता सायकलशिवाय पर्याय नाही.
- आकाश गाडे, नगर