लोकमत न्यूज नटवर्कलोणी/ बोटा : लोणी बुद्रुक (ता़ राहाता) येथील सोनगाव रस्त्याजवळील सुनील वाबळे यांच्या शेतात बिबट्या जेरबंद करण्यात आला. तर केळेवाडी (ता़ संगमनेर) शिवारात एक बिबट्या मृतावस्थेत आढळला़सोनगाव रस्त्यालगत १५ ते २० दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याने वन विभागाने वाबळे यांच्या उसाच्या शेतात पिंजरा लावला होता. ८ दिवसांपूर्वी बिबट्याचा एक बछडाही जेरबंद करण्यात आला होता. त्यानंतर सोमवारी पहाटे दुसरा बिबट्याही जेरबंद करण्यात आला. आणखी ३ ते ४ पिल्ले उसाच्या शेतात असल्याचे वाबळे यांनी सांगितले. या बिबट्याच्या दहशतीमुळे आसपासचे सर्व शेतकरी व नागरिक त्रस्त झाले होते. केळेवाडी (ता़ संगमनेर) येथील अकलापूर रस्त्यावरील शेताच्या कडेला असलेल्या ओढ्यात हा बिबट्या मृतावस्थेत असल्याचे ग्रामस्थांनी पाहिले. पोलीस पाटील शिवाजी शेळके यांनी वन विभागाला याबाबत कळविले. बिबट्याच्या मृत्यूचे वृत्त समजताच घारगाव वन परिमंडळाचे वनरक्षक झेड. एन. राजे, तानाजी फापाळे, अनंता काळे घटनास्थळी आले. त्यांनी मृत बिबट्याचा पंचनामा करून त्याला शवविच्छेदनासाठी चंदनापुरीच्या निसर्ग परिचय केंद्रात नेले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील शिदोरे व डॉ. बी. एन. फटांगरे यांनी मृत बिबट्याचे शवविच्छेदन केले.
एक बिबट्या जेरबंद; दुसरा मृत्यूमुखी
By admin | Updated: June 28, 2017 18:04 IST