भेंडा : देवगाव (ता. नेवासा) येथील मुळा उजवा कालव्यालगत गिलबिले वस्ती परिसरात आठवड्यापासून वास्तव्यास असलेल्या नर जातीच्या बिबट्याला मंगळवारी जेरबंद करण्यात आले.हा बिबट्या रात्री ऊस व केळीच्या शेतात दिसल्याचे सोमनाथ निकम, नवनाथ भिसे यांनी सांगितले. त्यामुळे शांताबाई गिलबिले यांच्या केळीच्या शेतात, ओढ्याच्या कडेला वनविभागाने पिंजरा लावला होता. बिबट्याने विठ्ठल खंबरे यांची शेळी पकडली होती. शेळीला बिबट्याचे दात लागले, परंतु शेळी बिबट्याच्या तावडीतून वाचली. याच शेळीला पिंजऱ्यात भक्ष्य म्हणून ठेवण्यात आले होते. पिंजऱ्यात अडकलेला बिबट्या तीन वर्षे वयाचा नर आहे. या बिबट्याला (माणिकडोह, ता. जुन्नर) येथील बिबट्या निवारण केंद्रात जागा असल्यास सोडणार अन्यथा निसर्गात मुक्त करणार असल्याची माहिती वनपाल साहेबराव ढेरे यांनी दिली. बिबट्याला वनरक्षक पी. डी. कदम, वनमजूर चांगदेव ढेरे, सयाजी मोरे, मुक्ताजी मोरे यांनी सुरक्षितस्थळी हलविले. (वार्ताहर)
देवगावात बिबट्या जेरबंद
By admin | Updated: June 14, 2016 23:19 IST