Leopard Attack: उसाचे क्षेत्र पेटवल्याने लपलेल्या बिबट्याने आपला जीव वाचवण्यासाठी बाहेर धाव घेतली आणि त्यानंतर समोर झाडाखाली बसलेल्या एका वृद्धावर त्याने हल्ला केला. तसंच परत माघारी फिरत बिबट्याने तीन तरुणांना जखमी केले. ही घटना रविवारी दुपारी राजूरजवळील कोहंडी शिवारात घडली. या चारही जखमींना अहिल्यानगर येथे हलवण्यात आले.
कोहंडी शिवारात एका शेतकऱ्याच्या उसाला तोड आली होती. ऊस तोडण्यापूर्वी उसाचे क्षेत्र पेटवून देण्यात आले. आगीचे लोळ पाहून या ऊसात असलेल्या बिबट्याने बाहेर धाव घेतली. समोरच एका झाडाखाली यशवंत रामा कचरे (वय ६५) हे बसले होते. बिबट्याने त्यांच्यावर हल्ला करत पुढे धाव घेतली. यावेळी त्याच्या मागे राजू रामचंद्र परते (वय २५), कैलास प्रकाश तपासे (वय २५) व तुषार लिंबा परते (वय २०) हे तिघे गेले बिबट्याने परत फिरत या तिघांनाही जखमी केले. राजूर वनपरिक्षेत्र अधिकारी डी. डी. पडवळे, वनपाल एस. एन. बेनके, योगेश डोंगरे, वनरक्षक बी. डी. जाधव, किसन दिघे, संतोष दिघे आदींनी घटनास्थळी दाखल होत जखमींना राजूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉ. अभिनय लहामटे यांनी उपचार करून पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथे हलविण्यात आले. यावेळी शेजारी लहान मुले खेळत होती. आरडाओरड झाल्यानंतर लहान मुलांनी घरात धूम ठोकली.
"तालुका रुग्णालयात इंजेक्शन उपलब्ध करा"बिबट्याने हल्ला केल्यानंतर यावर प्रतिबंधात्मक म्हणून रेबीज इमिनोग्लोबीन इंजेक्शन दिले जाते. मात्र, हे इंजेक्शन केवळ जिल्हा रुग्णालयात उपलब्ध असते. राजूर येथून नाशिक जवळ असल्याने शक्यतो रुग्णांना नाशिक येथे हलविण्यात येते. मात्र, नाशिक जिल्हा रुग्णालयात चौकशी केली असता तेथे हे इंजेक्शन उपलब्ध नसल्याचे समजले. जखमींना इंजेक्शन घेण्यासाठी अधिकचा प्रवास करत अहिल्यानगर येथे हलविण्यात आले. शासनाच्या तालुका रुग्णालयात हे इंजेक्शन उपलब्ध असावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.