संगमनेर : बिबट्याने केलेल्या हल्ल्यातून बचावलेले तालुक्यातील कोल्हेवाडीचे उपसरपंच जालिंदर दिघे हे दुचाकीवरून पडून गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. सोमवारी रात्रीच्या सुमारास उपसरपंच दिघे हे आपल्या दुचाकीवरून संगमनेरहून कोल्हेवाडीला चालले होते. कोल्हेवाडी शिवारातील अरगडे व काळे वस्तीनजीक अंधारात रस्त्याच्या कडेला असलेल्या उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक दिघे यांच्यावर झडप घातली. परंतु दुचाकी पुढे निघून गेल्याने दिघे या हल्यातून बालंबाल बचावले. त्यानंतर बिबट्याने दिघे यांचा पाठीमागून पाठलाग करायला सुरूवात केली. पाठीमागून बिबट्या पळत येत असल्याचे पाहून दिघे भयभीत झाले. दुचाकीचा वेग वाढविण्याच्या नादात ते रस्त्याच्या कडेला खोल खड्यात जाऊन पडले. त्यात त्यांचा हात मोडला. कपाळ व डोक्याला गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या. दरम्यान दिघे यांच्यावर एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत. बिबट्याच्या दहशतीने परिसरातील नागरिक धास्तावले असून पिंजरा लावण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)
पिंजऱ्यात बिबट्या अडकलाअकोले : रुंभोडी-इंदोरी-मेहेंदुरी परिसरात बिबट्यांनी धुमाकूळ घातला असून, वन विभागाने लावलेल्या एका पिंजऱ्यात बुधवारी एक बिबट्या अलगद अडकला. याच परिसरात पाच पिंजरे लावलेले आहेत. दरम्यान, बिबट्याला सुगाव रोपवाटिकेत ठेवण्यात आले आहे.गेल्या आठवड्यात बिबट्याने दोन बालिकांसह चौघांवर हल्ला करून जखमी केले होते. तसेच बिबट्या परिसरातील शेळ्यांचाही फडशा पाडत आहेत. चार किलोमीटरच्या चौरस क्षेत्रातच या घटना घडल्या आहेत. एकाच बिबट्याने हे सर्व हल्ले केले असावेत, त्याच्या पायाच्या ठशांवरुन बिबट्या वयाने लहान व नवखा असावा, त्याला शिकारीची माहिती नाही, आईपासून तो दुरावला असावा, असा अंदाज वनखात्याचे व्यक्त केला आहे. तर परिसरात चार बिबटे व सहा बछडे असावेत असे शेतकरी सांगतात. बुधवारी एक बिबट्या पिंजऱ्यात अडकला. ‘शेतकऱ्यांनी शेळ्या, बकऱ्या बंधिस्त जागी बांधाव्यात, शेत शिवारात फिरताना मोठ्याने बोलावे, गाणे म्हणावे, रेडिओ वाजवावा, लहान मुलांना एकट्यांना शेतात पाठवू नये, असे या परिसरात दवंडीने सूचित करण्यात आले आहे. मानवी वस्तीत बिबट्यांचा वावर वाढला असून रात्रीच्या वेळी शेतकरी शेतात पाणी भरायला जाण्यास धजावत नाहीत. आता दिवसाही बिबट्या हल्ला करु लागले आहेत.(तालुका प्रतिनिधी) बिबट्यांची संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी बिबट्यांवर ‘फॅमिली प्लॅनिंग’ शस्त्रक्रिया हा प्रस्ताव पुढे आला होता. तो वन्यजीव संरक्षण कायद्यामुळे बारगळला. अकोले तालुक्यात बिबट्याचे हल्ले रोखण्यासाठी व आपदग्रस्तांच्या मदतीसाठी ‘रेस्क्यू पथक’ असावे. तसेच तालुक्यात आदमखोर बिबट्यांसाठी ‘निवारा केंद्र’ असावे, अशी अपेक्षा वन्यजीवप्रेमींनी व्यक्त केली.