श्रीरामपूर : केंद्र सरकारने केलेल्या नवीन कृषी कायद्यांविरुद्ध शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या नेतृत्वाखालील लोकसेवा विकास आघाडीच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आल्याची माहिती आघाडीचे अध्यक्ष हिंमतराव धुमाळ यांनी दिली.
सरकारच्या कृषी धोरणांवर देशातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. या कायद्यातील तरतुदीमुळे शेतमाल विक्रीत मक्तेदारी तयार होईल. बाजार समितीनजीक खाजगी कंपन्यांना विपणनाची परवानगी दिल्यास शेतकऱ्यांना हमीभाव मिळणार नाही. करार शेतीमुळे शेती व्यवसाय भांडवलदारांच्या हाती जाईल. शेतमालाला शाश्वत भाव मिळण्यास संरक्षण राहणार नाही. साठेबाजी अनियंत्रित होऊन शेतमालाचे भाव पाडले जातील. या सर्व बाबी शेतकरीविरोधी असून, सदरच्या धोरणात बदल होण्याची आवश्यकता आहे, असे धुमाळ यांनी म्हटले आहे. मुरकुटे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यात आला. यावेळी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
----