पारनेर : तो दररोज कोणत्याही एस़टी़बसमध्ये चढायचा़ मुलींकडे पाहून विक्षिप्त हावभाव करायचा़ मुलींकडे पाहून इशारे करायचा़ त्याच्या छेडछाडीला कंटाळलेल्या मुलींनी त्याला धडा शिकविण्याचा बेत आखला़ सोमवारीही हा तरुण नेहमीप्रमाणे एका एस़टी़बसमध्ये चढला़ त्याच्या विक्षिप्त हालचाली सुरु होताच या रणरागिनींनी पकडून त्याची यथेच्छ धुलाई केली़पारनेर तालुक्यातील हंगा गावातील शहांजापुर रस्त्यावर राहणारा एक तरुण पारनेर बसस्थानकातील एस़टी़ बसमध्ये चढून मुलींची छेडछाड करीत होता. पारनेर महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींच्या हा प्रकार लक्षात आला. काही दिवसांपासून सुरु असलेले या मजनूचे चाळे दिवसेंदिवस वाढतच चालले होते़ अखेरीस या विद्यार्थिनींनी त्याला धडा शिकविण्याचा निर्णय घेतला़ सोमवारी दुपारी अडीच वाजल्यापासून या विद्यार्थिनी त्याच्यावर पाळत ठेवून होत्या़ तो तरूण बसस्थानकावर आल्यानंतर नेहमीच्या मवाली स्टाईलने वेगवेगळ्या एस़टी़बसमध्ये जाऊन मुलींकडे पाहून विक्षिप्त हालचाली करायचा़ एस़टी़ बस सुरु होण्याच्या वेळी तो त्या बसमधून खाली उतरायचा़ पुन्हा दुसऱ्या बसमध्ये चढायचा़ या मुलींची एस़टी़ बस फलाटावर आल्यानंतर सगळ्या विद्यार्थिनी बसमध्ये चढल्या़ त्यांच्यापाठोपाठ हा तरुणही एस़टी़बसमध्ये चढला़ मुलींकडे पाहून वेगवेगळे चाळे करणे, बळेच मुलींना खेटणे असे प्रकार करु लागला़ या मुलींनी एकमेकींना इशारा करुन एकदम सर्व मुली उठल्या आणि त्याला पकडून यथेच्छ धुलाई केली़ धुलाई केल्यानंतर या रणरागिणींनी या रोमिओला पारनेर पोलिसांच्या हवाली केले़ रात्री उशीरापर्यंत सुमारे शंभर-दिडशे मुला-मुलींनी पोलीस ठाण्यात थांबून या तरुणावर कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे केली़ पोलीस निरीक्षक दिलीप पारेकर यांनी कारवाईचे आश्वासन दिले़ रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. विद्यार्थिनींच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. (तालुका प्रतिनिधी)
रणरागिनींनी केली रोमिओची धुलाई
By admin | Updated: October 4, 2016 00:40 IST