संगमनेर : नगर शहरात निर्माण झालेली ऑक्सिजनची टंचाई रुळावर येत नाही तोच आज संगमनेर तालुक्याततील रुग्णालयांत ऑक्सिजन टंचाई निर्माण झाली आहे. काही तास पुरेल एवढाच ऑक्सिजन तेथे शिल्लक असल्याने रुग्णांचे नातेवाईक चिंतेत आहेत.
अहमदनगर जिल्ह्यात 21 हजारांच्यावर सक्रीय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात ऑक्सिजनची पातळी कमी असणारे व फुफुत्साची कार्यक्षमता (एचआरसीटी) कमी झाल्याने खासगी व शासकीय रुग्णालयात उपचार घेणारे रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. नगर शहरात टंचाई निर्माण झाल्याने संगमनेर तालुक्याला लागणारा ऑक्सिजन अहमदनगरला पाठवण्यात आला. अहमदनगरमध्ये ऑक्सिजनची टंचाई असल्याने तिथेही मोठी गरज होती. मात्र आता संगमनेर तालुक्यातील रुग्णांनाच ऑक्सिजन कमी पडत आहे. यामुळे संगमनेर शहर व तालुक्यातील डॉक्टरांनी चिंता व्यक्त केली आहे. ऑक्सिजन मिळाला नाही तर रुग्णांचा जीव धोक्यात येऊ शकतो, अशी चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हेही प्रशासनाच्या संपर्कात असल्याचे समजते.