श्रीरामपूर : बेलापूर येथील ग्रामस्थांनी चालविलेल्या मोफत कोविड सेंटरच्या लोकवर्गणी व जमाखर्चाचा तपशीलवार हिशोब ग्रामस्थांपुढे सादर करत आदर्श उभा केला आहे. कोविड सेंटर समितीला नागरिकांनी रोख देणग्या व साहित्य रुपाने मदत दिली होती. मात्र कोविडची साथ आटोक्यात आल्याने तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या उपस्थित सेंटरचा समारोप करण्यात आला.
ग्रामपंचायत, जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्र, मेडिकल असोसिएशन, केमिस्ट असोसिएशन आदींच्या सहकार्यातून हे सेंटर सुरू झाले होते. यात ५ लाख १९ हजार १०७ रुपये देगणीद्वारे जमा झाले. एकूण ३ लाख ५० हजार ४४५ रुपये यावर खर्च झाला. ग्रामस्थांकडे एक लाख ६८ हजार ६६२ शिल्लक राहिले.
कोविड सेंटरसाठी ५५ दात्यांनी खाद्य पदार्थ, वस्तू व अन्य साहित्य, अन्नधान्य, सॅनिटायझर, औषधे, फळे, मास्क, पीपीई किट आदी साहित्य पुरवून मदत केली. त्याचा खर्चाचा तपशीलही सादर करण्यात आला आहे. परिसरातील रुग्णांसाठी ५५ दिवस कोविड सेंटर चालविण्यात आले. यात २३३ रुग्ण उपचारानंतर बरे झाले. सेंटरमध्ये शिल्लक असलेली औषधे आता प्राथमिक आरोग्य केंद्राकडे सुपुर्द करण्यात आली आहेत. कॉट, बेडशीट, गाद्या, वाफेचे मशीन, गरम पाणी मशीन, बादल्या, रिकामे जार या वस्तू प्राथमिक शाळेत एका खोलीत ठेवण्यात आल्या आहेत.
आर्थिक हिशोबाच्या माहितीसाठी ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे या कार्यपद्धतीचे स्वागत केले जात आहे.
---------