केडगाव : केडगाव परिसरातील भाजीबाजार भरवण्यास महापालिकेने मनाई घातली असतानाही भूषणनगर, नगर - पुणे रोड येथे चोरी छुपके बाजार भरत आहे. तेथे खरेदीसाठी गर्दी होत आहे. फिजिकल डिस्टन्सचा पुरता फज्जा उडत आहे.
केडगाव, भूषननगर येथील झेंडा चौकात भरणारा भाजी बाजार कोरोनाला निमंत्रण देत आहे. मनपाने सर्वच भाजीपाला बाजार बंद करण्याचे आदेश दिले आहेत. घरोघरी जाऊन भाजीपाला विकण्यास परवानगी दिली असताना भूषणनगर लिंकरोड येथे दररोज सकाळी पंचवीस ते तीस भाजीविक्रेते ठाण मांडून बसत आहेत. मनपाचे भरारी पथक मात्र याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. भाजी खरेदी करताना नागरिक गर्दी करतात. अशावेळी सर्व नियम पायदळी तुडविली जात आहेत.
या परिसरात कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. तरी ही येथील नागरिकांना याचे गांभीर्य दिसून येत नाही. मनपाच्या भरारी पथकाच्या प्रमुखांना फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयल केला. मात्र, तो बंद होता. या भागात बहुतेक नागरिक सकाळी विनाकारण विनामास्क फिरत आहेत. लिंकरोडवर सकाळी व संध्याकाळी फिरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.
--
बाह्यवळण चार तास ठप्प..
नगर बाजार समितीने सर्व विक्री व्यवहार बंद केले आहेत. नेप्ती उपबाजारही बंद आहे. मात्र, तरीही रोज पहाटे नेप्ती उपबाजारच्या समोर बाह्यवळण रस्त्यावर भाजीपाला खरेदी- विक्रीचे व्यवहार चालतात. हे सर्व भर रस्त्यावर सुरू असल्याने सर्व रस्ता खरेदी-विक्री करणाऱ्यांच्या गर्दीने फुलून जातो. यामुळे बाह्यवळण मार्गावरील वाहतूक दररोज चार ते पाच तास ठप्प होते.