कर्जत : येथे आता एसटी बस डेपो होत असून, कित्येक वर्षांचे कर्जतकरांचे स्वप्न कृतीत उतरत आहे. पहिल्या टप्प्यात येथे ५० बसेस उपलब्ध होणार आहेत. यापुढे एसटी नसल्याने मतदारसंघातील कोणालाही शिक्षण सोडावे लागणार नाही, असे प्रतिपादन आमदार राेहित पवार यांनी केले.
कर्जत बस आगाराच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी बारामती ॲग्रोचे अध्यक्ष राजेंद्र पवार, विश्वस्त सुनंदा पवार, उपाध्यक्ष सुभाष गुळवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण घुले, तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर, पुजारी पंढरीनाथ काकडे, जिल्हा परिषद सदस्य गुलाब तनपुरे, नगरसेविका मनीषा सोनमाळी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितीन धांडे, प्रांताधिकारी अर्चना नष्टे, पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, तहसीलदार नानासाहेब आगळे, गटविकास अधिकारी अमोल जाधव, उपअभियंता अमित निमकर, मुख्याधिकारी गोविंद जाधव, के. के. थोरात कन्स्ट्रक्शनचे प्रशांत फलके, बापूसाहेब नेटके, डॉ. शबनम इनामदार आदी उपस्थित होते.
राेहित पवार म्हणाले, राजकारणात शब्द देऊन तो पूर्ण करण्याचा आमच्या सर्वांचा प्रयत्न राहील. तालुक्यातील अनेक रस्त्यांची कामे पूर्णत्वास आली असून, उर्वरित सर्व कामे लवकर मार्गी लागणार आहेत. युवकांना स्वावलंबी करण्यासाठी एमआयडीसीही येथे होणार आहे. सीना आणि कुकडी चारीची कामेही लवकरच करणार आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.
प्रास्ताविक प्रा. विशाल मेहत्रे यांनी केले. विभाग नियंत्रक विजय गिते यांनी आभार मानले.
---
२० कर्जत डेपो
कर्जत एसटी बस आगाराच्या कोनशिलेच्या अनावरणप्रसंगी आमदार रोहित पवार. समवेत नगरसेविका मनीषा सोनमाळी, शबनम इनामदार, राजेश्वरी तनपुरे आदी.