करंजी : राज्यात महिला असुरक्षित असून, उद्योगही इतर राज्यात जात आहेत़ मग राज्य कोणत्या बाबतीत नंबर वन आहे, हे राष्ट्रवादी व काँगे्रसने जाहीर करावे, असे आव्हान देतानाच राज्याचे तुकडे पाडून विदर्भ राज्य स्थापण्यासाठीच भाजपाने शिवसेनेशी असलेली युती तोडल्याचा आरोप शिवसेनेचे उपनेते रामदास कदम यांनी केला़राहुरी मतदारसंघात लोहसर येथील प्रचारसभेत ते बोलत होते़ कदम यांनी राष्ट्रवादी, काँगे्रस व भाजपावर जोरदार टीका केली़ ते म्हणाले, गेल्या पंधरा वर्षापासून राज्यात आघाडीचे सरकार आहे़ सरकारने भारनियमन बंद करण्याचे आश्वास दिले होते़ ते पाळले नाही़ राज्यात महिला सुरक्षित राहिल्या नसून, महिलांना घराबाहेर पडायला भीती वाटत आहे़ महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यांकडे जात असून, राज्य कशात नंबर वन आहे, हे काँगे्रस-राष्ट्रवादीने जाहीर करावे़ राज्याचे तुकडे पाडून भाजपाला वेगळे विदर्भ राज्य करण्याची घाई झाली आहे़ त्यासाठीच त्यांनी शिवसेनेशी असलेली २५ वर्षांची युती तोडली आहे़ बबनराव पाचपुते व गावित हे एकाच माळेचे मणी आहेत़ भाजपा भ्रष्ट लोकांना पाठीशी घालीत असल्याचा आरोप कदम यांनी केला़ यावेळी सेनेच्या उमेदवार उषाताई तनपुरे, शिवसेनेचे उत्तर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, मोहनराव पालवे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
राज्य तोडण्यासाठीच काडीमोड
By admin | Updated: October 2, 2014 23:50 IST