केडगाव : नगर शहराभोवती सर्व राज्यमार्गांना जोडणारा बाह्यवळण रस्ता भरधाव वेगाच्या वाहतुकीमुळे धोकादायक बनला आहे. केडगाव बायपास चौकात तर गेल्या काही दिवसांपासून अपघातांची मालिकाच सुरू आहे. रोजच होणाऱ्या अपघातांमुळे या चौकात धडकलेल्या वाहनांच्या काचांचा खच पडला आहे. वेगात येणाऱ्या वाहनांना नियंत्रित करणारी यंत्रणा कार्यान्वित नसल्याने अपघातांची संख्या वाढली आहे.शहरात होणारी वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी शहराबाहेरुन बाह्यवळण रस्ता करण्यात आला आहे. अरणगाव येथील पुलाचे काम पूर्ण झाल्याने हा बाह्यवळण रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला आहे. सोलापूर, पुणे, मनमाड, औरंगाबाद, दौंड, कल्याण या राज्यमार्गावरील अवजड व इतर वाहतूक आता याच बाह्यवळण रस्त्यावरून सुरू आहे. यामुळे या मार्गावर रात्रं-दिवस भरधाव वेगात वाहनांची वाहतूक सुरू असते. मात्र वाहतुकीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कुठल्याच उपाययोजना नसल्याने या मार्गावर विशेषत: केडगाव बायपास चौकात अपघातांची संख्या रोजच वाढत आहे. पुणे मार्गावरुन येणारी वेगाची वाहने आणि हा चौक ओलांडणारी वाहने यांच्यात वाहतुकीच्या बाबतीत कुठलाच ताळमेळ बसत नसल्याने वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात होत आहेत. या अपघातात आतापर्यंत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यात जखमी झालेल्यांची तर गणतीच नाही. या चौकात सध्या रोजच्या लहान- मोठ्या अपघातांची मालिकाच सुरू आहे. दोन दिवसातच या चौकात चार अपघात घडले आहेत. पहाटेच्या वेळी व रात्री होणाऱ्या अपघातांची संख्या जास्त आहे. शुक्रवारी पहाटे पुण्यावरून येत असलेल्या एस.टी.ला ट्रकची धडक बसली. यात बसची उजवी बाजू पूर्णपणे चिरडली गेली. या अपघातात २१ प्रवासी जखमी झाले. वाहतुकीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य ठरतील, अशा कुठल्याच उपायांची अंमलबजावणी येथे होत नसल्याने हा अपघातांचा सिलसिला सुरूच आहे. मात्र यात नाहक निष्पाप प्रवाशांचे जीव जात आहेत. अनेकांना यामुळे कायमचे अपंगत्व आले आहे. भरधाव वेगातील वाहने अचानक या चौकात समोरासमोर येत असल्याने अपघातांची संख्या वाढत आहे. भविष्यात एखादा मोठा अपघात झाल्यानंतर उपाययोजना करण्याअगोदर त्यापूर्वीच वेगाला नियंत्रित करणारी यंत्रणा कार्यान्वित करण्याची तातडीची गरज निर्माण झाली आहे.(वार्ताहर)
केडगाव बायपास चौक बनलाय मृत्युचा सापळा
By admin | Updated: February 21, 2016 23:48 IST