केडगाव : तालुक्यातील जेऊर येथील नव्याने बांधण्यात आलेल्या व्यापारी संकुलाच्या गाळ्यांचे फेरलिलाव करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने लिलाव प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे.
जेऊर येथे ५० लाख रुपये खर्च करून भव्य व्यापारी संकुल बांधण्यात आले आहे. नूतन व्यापारी संकुल प्रकरण तालुक्यात चांगलेच गाजले होते. आरोप - प्रत्यारोप, न्यायालयीन प्रक्रिया पार पाडून गाळ्यांचे लिलाव २६ ऑक्टोबर २०२० रोजी करण्यात आले होते. गाळ्यांच्या लिलावात बोली लावूनही काहींनी बोलीची रक्कम ग्रामपंचायतीकडे जमाच केली नाही, तर काहींनी लिलावात बोली लावून घेतलेले गाळे सुरू करण्यापूर्वीच परत ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित केले. त्या गाळ्यांचा आता फेरलिलाव होणार आहे. संकुलाचे काम दोन टप्प्यांत करण्याचे नियोजन असून, पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले आहे. तरी दुसऱ्या टप्प्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
----
मुख्य बाजारपेठ अतिक्रमणात
जेऊर गावची संपूर्ण बाजारपेठ सीना नदीच्या पात्रात अतिक्रमणात वसलेली आहे. अतिक्रमण कायम करण्याबाबत काही व्यापाऱ्यांनी नाशिक विभागीय आयुक्तांकडे धाव घेतली होती. परंतु, व्यापाऱ्यांचे अतिक्रमण हटविण्याचे आदेश ग्रामपंचायतीला आयुक्तांनी दिलेले आहेत.
-------
ग्रामपंचायतीने गाळ्यांचे लिलाव लवकर करावेत. जेणेकरून गाळेधारकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. गाळे बांधून एक वर्ष झाले तरी काही गाळे बंद असल्याने ग्रामपंचायतीबरोबर ग्रामस्थांचेही नुकसान होत आहे.
- सचिन तोडमल,
ग्रामस्थ, जेऊर
----
विस्थापित व्यापाऱ्यांचे पुनर्वसन
व्यापारी संकुलात नव्याने १३ गाळे बांधण्यात आले. त्यामधील ७ गाळे हे संकुल बांधकामात विस्थापित झालेल्या दुकानदारांसाठी आरक्षित ठेवण्यात आले आहेत.
----
२८ जेऊर गाळे
जेऊर येथे ग्रामपंचायतीने बांधलेले गाळे.