जामखेड : शिवजयंतीनिमित्त शंभुराजे कुस्ती संकुलाच्या वतीने शुक्रवारी (दि. १९) जामखेड येथे राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. येथे पहिली कुस्ती माउली जमदाडे (भारत केसरी) विरुद्ध बाला रफिक शेख (महाराष्ट्र केसरी) यांच्यात १ लाख ५१ हजार रुपयांची होणार आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी, माजी मंत्री प्रा. राम शिंदे, आमदार रोहित पवार हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती आयोजक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष मंगेश आजबे यांनी दिली. शंभूराजे कुस्ती संकुल मागील तीन वर्षांपासून शिवजयंतीनिमित्त कुस्त्या आयोजित करीत आहेत. त्यानुसार यावर्षीही ही स्पर्धा होत आहेत. त्यानुसार शुक्रवारी (दि. १९) सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची मिरवणूक स्वाभिमानी शेतकरी पक्ष कार्यालयापासून निघेल. ल. ना. होशिंग विद्यालयाच्या प्रांगणात समाप्त होऊन तेथे कुस्त्यांचा हगामा होईल. प्रथम क्रमांकाची कुस्ती माउली जमदाडे व बाला रफिक यांच्यात होईल. विजेत्याला दीड लाख रुपये, द्वितीय क्रमांकाची कुस्ती सागर मोहळकर (साकेश्वर केसरी) विरुद्ध संग्राम पाटील (सेना दल पुणे) यांच्यात होत आहे. यासाठी १ लाख रुपये तर तृतीय क्रमांकाची कुस्ती बापू जरे (साकेश्वर केसरी) विरुद्ध अक्षय डुबे (पुणे) यांच्यात ७५ हजार रुपयांची होणार आहे.