राजूर/अकोले : एकेरी रस्ता, एका बाजूला उंच डोंगर, तर खालच्या बाजूला खोल दरी, अशात तब्बल ५६ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसचे ब्रेक अचानक निकामी होते... समोर साक्षात मृत्यू असताना केवळ प्रसंगावधान राखून मोठ्या कसरतीने चालकाने ही ५६ प्रवाशांची बस रोखली... तसा प्रवाशांनी जीव वाचल्याच्या आनंदात सुटकेचा नि:श्वास सोडला. गुरूवारी सकाळी नऊ वाजता अकोले आगारातून अकोले-कसारा ही बस सुटली. साडे दहाच्या सुमारास ही बस कोल्हार घोटी रस्त्यावरील बारी घाटातून जात होती. घाटात एका बाजूला खोल दरी तर दुसऱ्या बाजूला डोंगर अशा परिस्थितीत रस्त्यातील एक खड्डा चुकवत असताना त्या बसचा स्टेअरिंग रॉड तुटला व त्या पाठोपाठ गाडीचे ब्रेकही निकामी झाले. गाडीत बसलेल्या प्रवाशांना याची कुठलीही खबरबात नव्हती. मात्र चालक मच्छिंद्र घोडके यांनी प्रसंगावधान राखून बस खडकावर धडकवली.त्यामुळे बसचे पुढचे चाकही निखळले होते. परंतु बसचा वेग कमी झाला. त्यामुळे गाडीचा रॉड मागील चाकामध्ये जाऊन अडकला व बस समोरच्या मातीमध्ये जाऊन अडकली. ज्या ठिकाणी ही गाडी अडकली, त्यापुढे सुमारे २०० फुटाची खोल दरी होती, मात्र गाडीतील प्रवाशांचे दैव बलवत्तर म्हणून ही बस दरीच्या मागे अडीच-तीन फुटांच्या अंतरावरच अडकली. गाडी आदळत गेल्यामुळे १७ प्रवासी जखमी झाले. यातील चालकालाही मार लागला. घोडके व महिला वाहक ए. डी. गोंदके यांनी घोटी पोलीस ठाण्यात खबर दिली. दरम्यान अकोले आगाराच्या एस. टी.बस अनेकवेळा नादुरुस्त होतात त्यामुळे प्रवाशांच्या जीवाचाही खेळ होऊ शकतो, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताना याची सखोल चौकशी करण्याची मागणी जखमी प्रवाशांनी एस.टी च्या अधिकाऱ्यांकडे केली.(वार्ताहर)१७ प्रवासी जखमी या अपघातात १७ प्रवाशी जखमी झाले. भाऊ लक्ष्मण चौधरी (वय ३०) संतोष बबन शिर्के (वय ३२), मंगेश राजू भांगरे यांना अकोल्यातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर चालक घोडके व इतर दोघे यांना नाशिक येथे हलवण्यात आले. कैलास एकनाथ शिंदे (वय ६५), शोभा कैलास शिंदे (वय ६०), सुनील हरी बांबेरे (वय ३२), दिलीप भाऊराव उघडे (वय ४०), गणपत बुधा उघडे (वय २६), किसन धुंदा कोकतरे (वय ३८), संतोष रामा सोडणार (वय२५), मच्छिंद्र निंबा हिले (वय ४६), चंद्रभान विठ्ठल भोर (वय २९), मीना रमेश राऊत (वय ५०), रमेश काशिनाथ राऊत (वय ५७)आदी जखमींना अकोले ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले.
... तर बस कोसळली असती २०० फूट दरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2016 23:57 IST