अहमदनगर : कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी महत्त्वाचे पुरावे मिळविण्यासाठी न्यायवैद्यक शास्त्र विभागाचे पथक मंगळवारी नगरमध्ये दाखल झाले. या पथकाने कोपर्डी येथे जाऊन दिवसभर वैद्यकीय पुरावे मिळविण्याचा प्रयत्न केला. अत्याचाराच्या खटल्यात भक्कम साक्षीपुरावे मिळविण्यासाठी पोलीस अधीक्षक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक व स्थानिक गुन्हे शाखेने प्रयत्न सुरु केले आहेत. केईएम हॉस्पिटलमधील पाच डॉक्टरांचे पथक कोपर्डीत आले होते. घटनास्थळी आढळलेल्या रक्ताची व इतर बाबींची तपासणी त्यांनी सुरु केली आहे. यातून आरोपींचा डीएनए मिळविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या घटनेत पप्पू ऊर्फ जितेंद्र बाबूलाल शिंदे, संतोष गोरख भवाळ व नितीन गोपीनाथ भैलूमे यांना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यात चौथ्याही एका आरोपीचे नाव घेतले जाते. मात्र, तीन आरोपींव्यतिरिक्त इतर आरोपींची नावे अद्याप समोर आलेली नसल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. कोपर्डीतील स्थानिक नागरिक घटनेबाबत पोलिसांना अद्याप फारशी माहिती देत नाहीत. नागरिकांना ज्या बाबी माहित असतील त्या त्यांनी पोलिसांना सांगणे आवश्यक आहे, असेही एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. ही घटना जिल्हा पोलीस दलाने गांभीर्याने घेतली असून सर्व प्रकारचे पुरावे मिळविण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न तसेच कोपर्डीत भेटी देणाऱ्यांची रीघ लागल्याने तपासात अडथळे येत आहेत. (प्रतिनिधी)
न्यायवैद्यक पथकाकडून कोपर्डीत तपासणी
By admin | Updated: July 20, 2016 00:22 IST