अहमदनगर : संजय गांधी निराधार योजनेत ४४ लाभार्थी अपात्र असल्याबाबत तक्रार प्राप्त झाली होती. त्यांना पारनेर सैनिकी बँकेच्या कर्जत शाखेने सदर लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदान जमा केले किंवा नाही, याबाबत चौकशी करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला होता; मात्र याबाबत कार्यवाही न केल्याने जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी कर्जतच्या तहसीलदारांना नोटीस बजावली आहे. सात दिवसात खुलासा न केल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशाराही नोटिसीत दिला आहे.
संजय गांधी निराधार योजनेमध्ये पारनेर तालुका सैनिकी बँकेच्या कर्जत शाखेने शासकीय रकमेचा अपहार केल्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार प्राप्त झाली होती. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली २२ डिसेंबर २०२० रोजी बैठक झाली. त्यामध्ये कार्यवाहीच्या सूचना कर्जत तहसीलदारांना देण्यात आल्या होत्या. तक्रारदारांच्या अर्जामधील माहितीनुसार ४४ लाभार्थी हे अपात्र होते. सदर लाभार्थ्यांच्या बँक व्यवहाराचा तपशीलही तक्रारदाराने देण्यात आला होता. सदर लाभार्थ्यांबाबत वस्तुनिष्ठ व स्थानिक चौकशी करावी, सदर लाभार्थी हे पात्र आहेत का, वितरित करण्यात आलेले अनुदान वसुलीस पात्र आहे का, पारनेर तालुका सैनिकी बँकेने अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केले होते का याची चौकशी करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना दिला होता. याबाबत सहकारी संस्थेचे विशेष लेखापरीक्षक वर्ग-१ यांनीही चौकशीचे निर्देश दिले होते. याबाबत वेळोवेळी अहवाल सादर करण्याचे कळविण्यात आले होते. मात्र सदरचा विषय तहसीलदारांनी गंभीरपणे घेतला नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी नोटिसीत नमूद केले आहे. तहसीलदारांच्या कामात सचोटी व कर्तव्य परायणता नसून चौकशी न करण्याची ही वर्तणूक शिस्तभंग ठरत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.