मंगळवारी दुपारी गर्भगिरी डोंगराच्या पायथ्याला असलेल्या कोळ्याची वाडी परिसरामध्ये चारा आणि पाण्याच्या शोधार्थ भटकंती करणारा हरणाचा कळप कायमच फिरत असतो. मंगळवारी दुपारी याच परिसरात पाण्याच्या शोधार्थ फिरत असलेल्या हरणाला मोकाट कुत्र्यांनी गाठले व या हरणाला जखमी केले. त्याच वेळी तेथे मेंढ्या चारत असलेले मेंढपाळ नवनाथ माहांडुळे, कृष्णा महांडुळे, लक्ष्मी महांडुळे यांनी तत्काळ या हरणाकडे धाव घेऊन कुत्र्यांच्या तावडीतून त्याला वाचविले. जखमी हरणाला पोत्याची झोळी करून घरी घेऊन आले.
याबाबत वन्यजीवप्रेमी श्री संत सावता माळी युवक अध्यक्ष अशोक तुपे यांना माहिती कळताच तत्काळ त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक उपचार करून वन विभागाशी संपर्क साधला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन वनविभागाचे कर्मचारी दाखल झाले. त्यानंतर वांबोरीचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. टी. ठवाळ व राजेंद्र तेलोरे यांनी हरणावर उपचार करून नंतर त्याला डिग्रस येथे नेण्यात आले.