सुपा : पारनेर तालुक्यातील सुपा येथे आता कोरोना प्रतिबंधक लस मिळण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांचे लस घेण्यासाठी पूर्वीप्रमाणे रुईछत्रपती येथील आरोग्य केंद्राकडे होणारे हेलपाटे मारणे बंद झाले आहे. या कामी ग्रामपंचायतीने आरोग्य विभागास सर्वतोपरी मदत करण्याची भूमिका घेतली व आरोग्य विभागाने त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला. शुक्रवारी १५५ जणांना एकाच दिवसात लस मिळाली, अशी माहिती समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. विद्या बारवकर यांनी दिली.
सुप्यासह परिसरातील १३ गावांसाठी शासकीय आरोग्य सेवेचा लाभ घेण्यासाठी रुईछत्रपती आरोग्य केंद्रावर जावे लागत होते. तेथे जाण्यासाठी ना रस्ता, ना एसटी, त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचे हाल होत होते. रस्त्याची दुरवस्था व लस घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांचे होणारे हाल याकडे लक्ष वेधले होते.
तेथे सुप्यासह हंगा, शहजापूर, लोणी, मुंगशी, वाळवणे, रायतळे, रांजणगाव, अस्तगाव, आपधूप, पिंप्री गवळी व रुईछत्रपती आशा १३ गावांतील लोकांना लस घेण्यासाठी जावे लागत होते. परिणामी, तेथे होणारी गर्दी हा आरोग्य कर्मचाऱ्यांच्या डोकेदुखीचा विषय बनला होता. आता किमान सुप्यातील लाभार्थींच्या गर्दीतून संख्या कमी होईल. यापूर्वी हंगा येथे असेच लसीकरण करण्यात आले होते. येथे २८७ लोकांना त्यावेळी लस दिल्याची माहिती आरोग्य समुदाय अधिकारी डॉ. विद्या बारवकर यांनी दिली.