दहिगावने : देशभरात सप्टेंबर महिना ‘पोषण महिना’ म्हणून साजरा केला जात आहे. यानिमित्ताने जनता शिक्षण प्रसारक मंडळाच्या नवजीवन विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी कृषी विज्ञान केंद्र, दहिगावने (ता. शेवगाव) येथे आयोजित पोषण अभियान कार्यक्रमाला प्रा. मकरंद बारगुजे यांच्या पुढाकाराने भेट देऊन पोषण आहाराची माहिती घेतली.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य डॉ. तेजश्री लंघे यांनी महिलांमध्ये जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे होणारे आजार आणि ते आजार होऊ नयेत म्हणून संतुलित आहार कसा असावा, याबाबत मार्गदर्शन केले. आपला आहार पोषक व्हावा, संतुलित व्हावा याकरिता दैनंदिन आहारामध्ये काय बदल केले पाहिजेत, याविषयी दहिगावने प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुमित श्रावणे व डॉ. कैलास कानडे यांनी मार्गदर्शन केले. कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून महिलांनी पोषक परसबागेची जोपासना करावी, असे आवाहन इंजिनिअर राहुल पाटील यांनी केले. कृषी विभागाच्या माध्यमातून महिलांसाठी होत असलेल्या कार्याची माहिती मंडल कृषी अधिकारी वैशाली पाटील यांनी दिली.