अहमदनगर : कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व खून प्रकरणातील आरोपी जितेंद्र उर्फ पप्पू बाबुलाल शिंदे याच्या पोलीस कोठडीत २७ जुलैपर्यंत वाढ करण्यात आली़ शिंदे याची कोठडीची मुदत संपल्याने पोलिसांनी त्याला शुक्रवारी जिल्हा न्यायालयासमोर हजर केले होते़ न्यायाधीश एस़ ई़ माने यांनी त्याला पाच दिवस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले़ कोपर्डी प्रकरणाचा तपास करत असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दुपारी मोठ्या बंदोबस्तात आरोपीला न्यायालयात दाखल केले़ यावेळी न्यायालय परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी सरकारी वकील अॅड़ सतीश पाटील यांनी युक्तीवाद करत आरोपीला सात दिवसांची कोठडी मिळावी, अशी मागणी केली़ कोपर्डी येथील घटना गंभीर असून, हे प्रकरण अतिशय संवेदनशील बनल्याने पोलिसांना सर्व बाजूने तपास करून पुरावे एकत्र करावे लागत आहेत़ घटना कुठे घडली, कशी घडली, आरोपी कुठे लपला होता या सर्व बाबींचा पोलिसांकडून तपास सुरू आहे़ वातावरण संवेदनशील असल्याने आरोपीला घटनास्थळासह इतर ठिकाणी घेऊन जाणे शक्य नाही़ त्यामुळे पुढील सविस्तर चौकशी आणि तपासासाठी आरोपीला कोठडी मिळावी, असा युक्तीवाद अॅड़ पाटील यांनी केला़ सरकारी पक्षाची बाजू ऐकून न्यायालयाने आरोपीस पाच दिवसांची कोठडी सुनावली़ दरम्यान या घटनेतील उर्वरित दोन आरोपींचीही सोमवारी (दि़२५) कोठडी संपणार असल्याने पुढील तपासणीसाठी पोलिसांना त्यांचीही कोठडी वाढवून घ्यावी लागणार आहे़ (प्रतिनिधी)
आरोपीच्या कोठडीत वाढ
By admin | Updated: July 23, 2016 00:12 IST