अहमदनगर : शहरासह उपनगरांत चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, शहर व परिसरात पोलिसांची गस्त वाढवावी, अशी मागणी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केली आहे. तसे पत्र वाकळे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना शुक्रवारी दिले.
महापौर वाकळे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, अहमदनगर शहर व उपनगरामध्ये चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गेल्या ९ ते १० महिन्यांपासून कोरोनासारख्या जागतिक महामारीमुळे नागरिक त्रस्त आहेत. अनेकांच्या हाताला काम नाही. नागरिक घरी बसून होते. सामान्य माणसांच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी त्यांना रोजगार उपलब्ध होत नव्हता. सध्याच्या परिस्थितीमध्ये कामधंदे थोड्या प्रमाणात सुरू झाले आहेत. केडगाव, सावेडी व उपनगरामध्ये येत्या ८ दिवसांपासून चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यासाठी रात्रीची गस्त व बंदोबस्त वाढविणे आवश्यक असल्याचे वाकळे यांनी पत्रात नमूद केले आहे.