विशेषत: श्रीरामपूर तालुक्यात बिबट्यांचे हल्ले वाढले आहेत. पार्श्वभूमीवर कोपरगाव येथील वनरक्षक भाऊसाहेब गाढे यांच्याशी संपर्क साधला. गाढे म्हणाले, तीन तालुक्यांमध्ये ८० च्या वर बिबट्यांची संख्या झाली आहे. पुरेशा मनुष्यबळाची वरिष्ठ स्तरावर वारंवार मागणी केली आहे. सध्या कार्यक्षेत्रामध्ये केवळ ३ गार्ड, १२ वन मजूर कार्यरत आहेत. वन संरक्षक आणि वनपालाच्या जागा रिक्त आहेत. त्यातच काही अधिका-यांवर इतर तालुक्यांचा अतिरिक्त कार्यभार सोपविला जातो.
तीन तालुक्यासाठी २५ पिंजरे उपलब्ध आहेत. यातील चार पिंजरे पाथर्डी येथे तर दोन नाशिक येथे दिले आहेत. लवकरच हे पिंजरे मागविले जातील. पिंज-यांची संख्या पुरेशी आहे. मात्र बिबट्यांबरोबरच हरीण, रानडुक्कर, माकड यांच्या बंदोबस्ताचीदेखील जबाबदारी सांभाळावी लागते, असे गाढे यांनी सांगितले.
---------
बिबट्या उघड्यावर
प्रवरा व गोदावरी नदीकाठचा भाग हा बारमाही पाणी व पाळीव प्राण्यांच्या उपलब्धतेमुळे बिबट्यांचे आवडते ठिकाण बनला आहे. सध्या मिलनाच्या काळात तो अधिक आक्रमक झाला असून हल्ले करत आहे. उत्तरेतील सर्वच साखर कारखान्यांचा हंगाम जोमाने सुरू आहे. त्यामुळे बिबटे उघड्यावर आले आहेत. हल्ल्यांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची भीती त्यामुळे व्यक्त केली जात आहे.
---------
सायंकाळनंतर फिरणे मुश्कील
प्रवरा नदीकाठच्या बेलापूर खुर्द, उक्कलगाव, गळनिंब, फत्याबाद या भागामध्ये बिबट्याची दहशत आहे. तेथे सायंकाळी ७ वाजेनंतर शेतकरी वर्ग घराबाहेर पडत नाही. सायंकाळनंतर या भागात शुकशुकाट होतो, अशी स्थिती आहे.
---------