अहमदनगर:यशस्विनी महीला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ ज बोठे याच्या बंगल्यात पोलिसांना हत्याकांडाबाबत महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत.
पोलिसांनी शनिवारी (दि.१२) बोठे याच्या नगर शहरातील बालिकाश्रम रोडवरील जिद्ध या बंगल्याची तसेच त्याच्या कार्यालयाचीही झडती घेतली. जरे यांची ३० नोव्हेंर रोजी हत्या झाल्यानंतर पोलीस तपासात अवघ्या दोन दिवसांत बोठे हाच या हत्याकांडाचा सूत्रधार असल्याचे समोर आले. गेल्या दहा दिवसांत पोलिसांनी बोठे याच्या घराची तीनवेळा झडती घेतली आहे.
शनिवारी पोलिसांनी बारकाईने बोठे याचा बंगला तपासला. यात महत्त्वपूर्ण पुरावे पोलिसांना मिळाले आहेत. तसेच सात दिवसांपूर्वी त्याचा साथीदार सागर भिंगारदिवे याच्या घराचीही झडती घेतली होती. यावेळी काही सीसीटिव्ही फुटेज पोलिसांना मिळाले आहेत. हत्याकांडात नाव निष्पन्न झाल्यानंतर बोठे नगर शहरातून पसार झाला. पोलीस गेल्या दहा दिवसांपासून त्याचा शोध घेत आहेत. तो नाशिकमध्ये लपल्याची माहीती होती. मात्र पोलीस पोहोचण्याआधीच तो तेथून पसार झाला. पोलिसांना बोठे सापडेना कसा असा प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
----------------