पारनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा व त्याची वाहतूक सर्रास सुरू आहे. हा अवैध वाळू उपसा व वाहतूक बंद होण्यासाठी संबंधित विभाग व अधिकाऱ्यांना संघटनेच्या वतीने तक्रार करून वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला. प्रशासन व वाळू व्यावसायिक शासनाची दिशाभूल करीत असून, शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडत आहे, तर अवैध वाळू उपसा व वाहतुकीचा सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
अवैध वाळू वाहतुकीमुळे या भागातील अनेक रस्ते खराब झालेले आहेत. सुसाट वेगाने वाळू वाहतूक करणाऱ्या अनेक डंपरमुळे अपघात झाले असून, यामध्ये काहींचा जीवही गेलेला आहे, तरीही अज्ञात वाहनाची नोंद घेण्यात आली आहे. वाळू व्यावसायिकांची पारनेर भागांमध्ये मोठी दहशत असल्यामुळे कोणीही तक्रार करण्यास पुढे येत नाही. वाळू व्यावसायिकांकडून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असताना, पोलीस संरक्षणही देण्यात येत नसल्याचे जिल्हाध्यक्ष रोडे यांनी स्पष्ट केले आहे. अवैध वाळू व्यवसाय करणारे व वाहतूक करणाऱ्या विरोधात २१ दिवसांच्या आत कारवाई न झाल्यास, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर येथील निवासस्थानी बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे, असे निवेदनात म्हटले आहे.