लहामटे म्हणाले की, तुम्ही लुटारू नसाल, तर वाईट वाटायचे काही कारण नाही. अगस्तीचा गाळप हंगाम सुरू करण्यासाठी संपूर्ण सहकार्य करू. शेतकरी, सभासद व कामगारांमध्ये यातून एक सकारात्मक व परिपक्व चर्चा होऊन यातून कारखाना अधिक कार्यक्षमतेने व काटकसरीने चालविला जावा यासाठी ही मोहीम आहे. कारखान्याकडून उपलब्ध झालेल्या माहितीच्या आधारे सत्य तथ्य या मोहिमेच्या माध्यमातून जनतेसमोर मांडले जात होते. मात्र, या मोहिमेमुळे कारखान्याचा पुढील गाळप हंगाम सुरू करण्यात अडचणी येत आहेत, असा प्रचार कारखाना सत्ताधाऱ्यांकडून सुरू झाला. सभासद व शेतकरी व कामगारांमध्ये यामुळे गैरसमज पसरत होते. संबंधितांना असे गैरसमज पसरवणे शक्य होऊ नये व नवा गळीत हंगाम सुरू करण्यास सहकार्य व्हावे यासाठी प्रबोधनाची ही मोहीम पुढील तीन महिने स्थगित करावी व आपल्या मुद्यांवर कायम राहत, हंगाम पार पडेपर्यंत संयम बाळगावा.
हंगाम सुरू होण्यात आमचा अडथळा नसेल, असलेच, तर सहकार्य असेल, असे यावेळी साथी दशरथ सावंत व बी.जे. देशमुख यांनी जाहीर केले. तीन महिन्यांनंतर लोकशाही अधिकाराचा पुन्हा वापर करू, असेही त्यांनी यावेळी सांगितले. आपले मुद्दे व मूल्य यावर ठाम राहत लोकप्रतिनिधींच्या आवाहनाला प्रतिसाद दिल्याबद्दल कॉम्रेड कारभारी उगले, डॉ. अजित नवले व विनय सावंत यांनी सावंत व देशमुख यांचे कौतुक केले.