श्रीरामपूर : कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर आपण गाफील राहिलो व बेजबाबदारपणे वागलो. त्यामुळे दुसरी लाट घातक ठरली. आता जबाबदारीने वागलो तर जुलै-ऑगस्टमध्ये येणारी तिसरी लाट त्रासदायक ठरणार नाही, अशी माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी आले असता, शासकीय विश्रामगृह येथे मुश्रीफ बोलत होते. यावेळी खासदार सदाशिव लोखंडे, आमदार लहू कानडे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, नगराध्यक्ष अनुराधा आदिक, राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव अविनाश आदिक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे, प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील उपस्थित होते.
मुश्रीफ म्हणाले, जिल्ह्यात नगर, संगमनेर आणि श्रीरामपूर येथे ऑक्सिजन प्रकल्पाची उभारणी केली जाणार आहे. श्रीरामपूर येथे ग्रामीण रुग्णालयात हा प्रकल्प होणार आहे.
शिर्डी येथे लवकरच दोन हजार बेड्सचे जम्बो कोविड रुग्णालय सुरु होणार आहे. यात दोनशे व्हेंटिलेटर बेड्सची सुविधा असेल. त्यामुळे जिल्ह्यातील सहा तालुक्यातील रुग्णांची मोठी व्यवस्था होणार आहे. यामुळे नगरला उपचारासाठी जाणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होईल, असा विश्वास पालकमंत्री मुश्रीफ यांनी व्यक्त केला.
नगरपालिकेने पुढाकार घेऊन जनता कर्फ्यू राबवावा, पालिका हद्दीतील अधिकार नगराध्यक्षांना असल्यामुळे त्यांनी निर्णय घ्यावा. त्यांना पोलीस व महसूल प्रशासन सहकार्य करेल, असेही त्यांनी सांगितले.
आमदार कानडे यांनी रेमडेसिविर व ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. अँटिजेन किट उपलब्ध करुन द्याव्यात, अशी मागणी केली.
----
श्रीरामपूर शहरात म्हाडामध्ये कोविड रुग्णालय उभारणार असाल तर त्याला लगेच परवानगी दिली जाईल. ३२ बेड्सचे ऑक्सिजन, दोन व्हेंटिलेटर आणि ६८ साधे बेड्स असलेले हनुमान ट्रस्टचे कोविड रुग्णालय सुरू झाल्यास श्रीरामपूरकरांची मोठी गैरसोय दूर होईल, असा विश्वास मुश्रीफ यांनी व्यक्त केला.