श्रीगोंदा : कुकडी साखर कारखान्यात अधिक लक्ष देण्यासाठी श्रीगोंद्यातील कुरुक्षेत्रात स्वत: उमेदवार नाही. पण निवडणुकीचे कुरुक्षेत्र सोडलेले नाही. श्रीगोंद्यात राष्ट्रवादीच्या उमेदवाराला साथ देऊन लढाई जिंकणार आहे. या निवडणुकीत चार पावले मागे आलो तरी पुढच्या निवडणुकीची आजच तयारी सुरू झाली आहे, असा इशारा आमदार राहुल जगताप यांनी दिला. पिंपळगाव पिसा येथे शनिवारी कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. याप्रसंगी जगताप बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाबासाहेब भोस होते. यावेळी राष्ट्रवादीचे उमेदवार घनश्याम शेलार, बाळासाहेब उगले, अरुण पाचपुते, दीपक भोसले, विश्वास थोरात, एकनाथ बारगुजे, अॅड. निवृत्ती वाखारे, अतुल लोखंडे, स्मितल वाबळे उपस्थित होते. जगताप पुढे म्हणाले, पाच वर्षे आपच सन्मानाने आमदारकी संभाळली. सामान्य माणसांची प्रतिष्ठा वाढविण्याचे काम केले. पण सध्या काही जण ईडी चौकशीला घाबरले, असा अपप्रचार करीत आहेत. पण त्यांनी कोट्यवधीची माया जमविली. शेतकºयांची बिले थकविली. ते घाबरत नाहीत. मी कशासाठी घाबरू, असा सवाल त्यांनी केला. स्व.कुंडलिक तात्यांनी मोठ्या कष्टाने कुकडी कारखाना उभा केला. पण सध्या कारखानदारीत खूपच अडचणी निर्माण झाल्या आहेत. अशा परिस्थितीत कुकडी कारखान्याच्या माध्यमातून शेतकºयांना न्याय देणे एवढेच काम करणार आहे. यातून शेतक-यांच्या प्रंपचाला उभारी देणार आहे. पण, काही जण म्हणणार आहेत जगताप संपले आहेत. पण या लढाईत चार पावले मागे घेऊन पुढच्या लढाईची तयारी सुरू झाली आहे. कार्यकर्त्यांनी चिंता करू नये. राजकारणात आपल्याला यापेक्षा चांगले दिवस येतील, असेही ते म्हणाले.
कुकडी कारखान्यासाठी थांबलो; पुढच्या वेळी पुन्हा मीच-राहुल जगताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 14:49 IST