दुष्काळाशी दोन हात करताना नगर जिल्ह्यातील बळीराजाचे कंबरडे मोडले आहे. तरी पण, मायबाप सरकारला काही अद्याप पाझर फुटला नाही़ केवळ दुष्काळी दौरे करण्याच्याच मुडमध्ये सरकार धन्यता मानत आहे़ दुष्काळाची खात्री आता आणखी किती दिवस करणाऱ जून उजाडला तरी दुष्काळी दौरे सुरूच आहेत़ याचा अर्थ दुष्काळाची खात्री सरकारला अद्याप तरी पटलेली दिसत नाही़ त्यासाठीच पुन्हा समिती जिल्ह्यात आली असून, साहेब दुष्काळाची पाहणी आता किती दिवस करणार, असा सवाल शेतकरी विचारत आहेत.साधारणपणे सात जूनला राज्यात मान्सूनचे आगमन होते़ त्यापूर्वी शेतकरी खरिपाच्या तयारीला लागतो़ शेताची नांगरणी, दुणनी करून सरी पाडून ठेवतो़ अर्थात ही त्याची खरिपासाठीची गुंतवणूकच असते़ पाऊस पडल्यानंतर पीक काही आभाळातून पडत नाही़ त्यासाठी आधी मशागत करावीच लागते़ ती केली तरच पाऊस पडल्यानंतर पीक येतं़ हे सर्वसाधारण शेतीचे गणित आहे़ मग जी काही मदत द्यायची ती या काळात मिळाली तरच त्याचा उपयोग होईल़ मशागतीसाठी सावकाराकडून कर्ज घेण्याची वेळ त्याच्यावर येणार नाही़ कारण गेल्या वर्षभरात एकही पीक साधले नाही़ मग पैसे येणार कुठून? खरिपापोटी पैसे मिळाले़ रब्बीचे ९५३ गावांतील पीक वाया गेले़ आकडेवारी सरकारने घेतली़ राज्याने ती केंद्राकडे पाठविली़ राज्याने यासाठी केंद्राकडे २ हजार २५१ कोटीची मागणी केली़ एवढी मोठी रक्कम पाहून केंद्राने डोळे वटारले़ मग, पुन्हा खात्रीचा फॉर्म्युला आलाच़ दुष्काळाची खात्री करण्यासाठी पुन्हा समित्या धाडल्या़ एवढेच नव्हे तर आता मंत्रीही येणार आहेत़ यापूर्वीही पथके आली आणि गेली़ त्यांना दुष्काळ दिसला नाही का? हा प्रश्न अनुत्तरीतच आहे़ रब्बीची पिके आता शेतकऱ्यांनी नांगरून टाकली़ पथक नांगरलेल्या शेतांची पाहणी करणार का?असाही प्रश्न आहे़ पाहणी करायचीच होती तर ती वेळेवर का नाही? केंद्राचे जूनमध्ये दुष्काळी दौरे म्हणजे वरातीमागून घोडे, असे म्हणावे लागेल़ यावर कळस असा की कुठे बुड टेकले नाही की पुढचे गाव, अशी पथकांच्या दौऱ्यांची अवस्था आहे़ दुष्काळाची खात्री करायचीच तर मग ती अशी का हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.
दुष्काळाची पाहणी किती दिवस?
By admin | Updated: June 2, 2016 23:06 IST