अहमदनगर : पारनेर, बेलवंडी आदी ठिकाणी घरफोड्या करणारा सराईत गुन्हेगार संजय पंडित भोसले (रा. कोळगाव, ता. श्रीगोंदा) याला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. त्याच्याकडून दीड लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शशिराज पाटोळे यांनी दिली.भोसले याने जिल्ह्यात अनेक ठिकाणी घरफोड्या केल्या आहेत. अनेक दिवसांपासून तो पोलिसांना हवा होता. गुन्हे शाखेचे एक पथक त्याच्या मागावर होते. रविवारी तो विसापूर फाटा येथे येत असल्याची पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेने सापळा रचून त्याला अटक केली. बेलवंडी, पारनेर परिसरात घरफोड्या केल्याची त्याने कबुली दिली आहे. त्याच्याकडून १ लाख ५० हजार रुपये किमतीचे दागिने हस्तगत केले असून त्याला पारनेर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पाटोळे यांनी व्यक्त केली आहे. अप्पर पोलीस अधीक्षक राजा सामी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजकुमार हिंगोले, पोलीस हेड कॉन्स्टेबल मधुकर शिंदे, दादासाहेब काकडे, पोलीस कॉन्स्टेबल दिगंबर कारखेले, मल्लिकार्जुन बनकर, विशाल अमृते, नामदेव जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.(प्रतिनिधी)
घरफोड्या करणाऱ्याला अटक
By admin | Updated: May 30, 2016 23:55 IST