श्रीगोंदा : कुकडीचे आवर्तन २५ एप्रिलला सोडावे, या प्रमुख मागणीसाठी कुकडी पाटपाणी कृती समितीचे अध्यक्ष राजेंद्र म्हस्के, मारुती भापकर, भूषण बडवे यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या इस्लामपूर येथील घरासमोर गुरुवारी सकाळी धरणे आंदोलन केले. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयाप्रमाणे आवर्तन सुटेल, असे आश्वासन पाटील यांचे मुख्य सचिव बाळासाहेब देशमुख यांनी दिले.
त्यानंतर आंदोलकांनी इस्लामपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नारायण देशमुख यांना निवेदन दिले.
त्यानंतर पुणे येथील कुकडी सिंचन भवनात कुकडीचे अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ यांच्या उपस्थितीत दुसरी बैठक झाली. कुकडीच्या आवर्तनाचा विषय ९ एप्रिलच्या बैठकीत झाला आहे. शेतकऱ्यांच्या भावना व पाण्याची गंभीर परिस्थिती विचारात घेऊन थोडेसे लवकर पाणी कसे सोडता येईल, यावर सकारात्मक विचार करणार आहे. यासंदर्भात जलसंपदा मंत्री व कालवा सल्लागार समितीच्या सदस्यांना विश्वासात घेतले जाणार आहे, असे धुमाळ यांनी सांगितले.
---
कालवा सल्लागार समितीच्या सदस्यांनी ९ एप्रिलला घेतलेली बैठक ही २५ मार्चला घेऊन त्याच दिवशी पिंपळगाव जोगेचे आवर्तन सोडले असते, तर २५ एप्रिलपासून आवर्तन सोडता आले असते. मात्र, केवळ कालवा सल्लागार समिती सदस्यांच्या हलगर्जीपणामुळे कुकडीचे आवर्तन एक महिना लांबणीवर पडले. यामुळे शेतकऱ्यांची पिके जळून खाक होणार आहेत. याला कालवा सल्लागार समितीचे सदस्य जबाबदार आहेत.
- मारुती भापकर, राजेंद्र म्हस्के
श्रीगोंदा
--
कुकडी आवर्तन लवकर मिळावे, या मागणीबाबत कुकडी पाटपाणी कृती समितीच्या वतीने २२ रोजी जलसंपदामंत्री यांच्या इस्लामपूर येथील घरासमोर धरणे धरले. त्यानंतर पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांना निवेदन दिले.